२३ टक्के भारतीयांचे अनोळखी ठिकाणी जाण्यास प्राधान्य
वर्षअखेरीस पर्यटनाला जाणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही अंदमान, लेह-लडाखला पसंती असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर परदेशी पर्यटनामध्ये वर्षांनुवर्षे लोकप्रिय असलेल्या थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशांबरोबरच बहुतांश देशांत साजऱ्या होणाऱ्या महोत्सवांना भेट देणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे निरीक्षण सहल आयोजकांनी नोंदविले आहे.
देशांतर्गत पर्यटनांबरोबरच यंदा परदेशी जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये विविध देशांमध्ये आयोजित होणाऱ्या विशिष्ट महोत्सवांना म्हणजे जपानमधील ‘चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल’, ‘टर्कीतील ट्रिमॉण्ट फेस्टिव्हल’, ‘स्पेनमधील टॉमेटिना फेस्टिव्हल’ अशा फेस्टिव्हलच्या दिवसांमध्ये या देशातील सहलींची मागणी वाढत आहे. याचबरोबर प्रचलित ठिकाणांपेक्षा काहीशा अनोळखी ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. ‘ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ने केलेल्या पाहणीनुसार २३ टक्के भारतीय पर्यटक अनोळखी ठिकाणी जाण्यास उत्सुक असतात, तर ३२ टक्के पर्यटक नातेवाईक व मित्रांच्या सल्ल्याने ठिकाण निवडतात. यातील कित्येक पर्यटक प्रथम भारतातील पर्यटन ठिकाणांना प्राधान्य देतात. काश्मीरमधील हल्ले, नेपाळमधील भीषण भूकंप, पॅरिसमधील दहशतवादी हल्ला याचा पर्यटनावर परिणाम होण्याची भीती असताना वस्तुस्थिती मात्र वेगळी असल्याचे केसरीच्या झेलम चौबल यांनी सांगितले. या घटनांचा पर्यटनावर परिणाम झाला नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांवर असणाऱ्या केसरीच्या पॅरिस सहलीतील एकही पर्यटक कमी झाला नसल्याचे चौबल यांनी नमूद केले. तर काश्मिरमधील पहलगम, गुलमर्ग, हिमाचल प्रदेशातील डलहौसी, शिमला आणि मनाली या बर्फाळ प्रदेशांच्या बुकिंगमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जच्या करण आनंद यांनी सांगितले.

व्यावसायिक सहलींमध्ये वाढ
वर्षांला हजारोंमध्ये व्यावसायिक सहली निघत असतात. विविध कंपन्यांतर्फे लोणावळा, जयपूर, हैद्राबाद, चेन्नई, महाबळेश्वर, गुजरात, गोवा, केरळ यांसारख्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन केले जाते. या सहलींमुळे पर्यटन वाढण्यास मदत होत असल्याचे चौबल यांनी सांगितले.

पुढील वर्ष भटकंतीसाठी महागडे
‘ट्रिप अ‍ॅडव्हायझर’ने केलेल्या पाहणीनुसार हॉटेल उद्योग क्षेत्रातील सेवांच्या किमतींमध्ये भारतात सुमारे ३९ टक्के तर परदेशात ४७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नवीन वर्ष हे भटकंतीसाठी महागडे ठरण्याची भीती आहे.