01 October 2020

News Flash

राज्यात २३ रक्तद्रव उपचार केंद्रे

गंभीर रुग्णांवर प्रयोग करणार पहिलेच राज्य

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात करोनाच्या रुग्णांवर  रक्तद्रव उपचारांचा (प्लाझ्मा थेरपी) केले जात असून त्याचा रुग्णांना फायदा होत आहे. या उपचार पद्धतीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी रक्तद्रव उपचार चाचणी (प्लाझ्मा थेरपी ट्रायल) केली जात आहे. त्यामुळे आता करोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी रक्तद्वर दान (प्लाझ्मा दान) करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयांत रक्तद्रव  उपचार सुविधा उभारण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयातील ‘प्लाटीना प्रोजेक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल’ केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी रक्तद्रवदान, रक्तद्रवपेढी, रक्तद्रव चाचणी आणि ईमर्जन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी रक्रद्रव उपचारांचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरू करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो,  तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये रक्तद्रव उपचाराचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज करोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे प्रतिपिंड तयार होतात, पण इथे रक्तद्रव उपचारांच्या माध्यमातून तयार  प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठय़ा प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी करोनाला हरवल आहे त्यांचा रक्तद्रव अन्य रुग्णांना देऊन त्यांना करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत रक्तद्रव  देऊ शकलो. त्यामुळे रक्तद्रव देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनावरील उपचारांत महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे, असा दावाही त्यांनी केला.

गंभीर रुग्णांवर प्रयोग करणार पहिलेच राज्य

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयांत ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर रक्तद्रव उपचार केले जातात. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर  हे उपचार केले जात आहेत.

ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत रक्तद्रव संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलित केलेला रक्तद्रव वैद्यकीय महाविद्यालयांत पुरविला जाईल. रक्तद्रव अर्थात ‘प्लाझ्मा थेरपी’ उपचार यशस्विता दर हा ९० टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अन्य रुग्णांसाठी रक्तद्रव  देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

करोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन

महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयांत रक्तद्रव उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरू  होत आहे. सीसीसीमधील जे रुग्ण बरे होऊन चालले आहेत तेथे १० दिवसानंतर २८ दिवसांच्या आत रक्तद्रव दान केले पाहिजे. रक्तद्रव कोणत्या रुग्णाला द्यायचा हे  डॉक्टर ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा  रुग्ण निवडला जातो. करोनातून पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून रक्तद्रव देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:30 am

Web Title: 23 plasma treatment centers in the state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 इंधन दरवाढीतून सामान्यांची लूट-थोरात
2 परीक्षा शुल्क परत द्यावे -शेलार
3 शेतकरी हवालदिल!
Just Now!
X