महाराष्ट्रात दुष्काळ असताना होळीच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करणाऱया आसाराम बापूंच्या २३ भक्तांना पोलिसांनी सोमवारी रात्री उशीरा अटक केली. होळीचे वार्तांकन करणाऱया पत्रकारांना मारहाण केल्याचा आणि त्यांच्याकडील साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. रबाळे पोलिस ठाण्यातील अधिकाऱयाने ही माहिती दिली.
महाराष्ट्राच्या विविध भागात गंभीर दुष्काळाचे चित्र असताना आसाराम बापूंनी रविवारी नागपूरमध्ये आणि सोमवारी नवी मुंबई होळीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात तिथे जमलेल्या लाखो भक्तांवर आसाराम बापूंनी फवाऱयाच्या साह्याने पाणी उडविले. केवळ होळीसाठी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करण्यात येत असल्याने माध्यमांनी त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहरांना आसाराम बापूंच्या काही भक्तांनी मारहाण केली. काही जणांच्या कॅमेऱयाची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे २३ जणांना अटक केली. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.