|| अक्षय मांडवकर

संरक्षित श्रेणीतील प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण ४२ टक्के

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमधील २३५ प्राण्यांचा एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मृत्यू झाल्याची माहिती ‘केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा’च्या (सीझेडए) वार्षिक अहवालामधून उघड झाली आहे. मृत्युदराच्या या संख्येत पक्षी, प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत प्रथम आणि द्वितीय श्रेणीत संरक्षण लाभलेल्या प्राण्यांची संख्या मृत्युदरामध्ये सुमारे ४२ टक्के एवढी आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला यापुढे राज्यातील प्राणिसंग्रहालयांच्या व्यवस्थापनावर आणि प्राण्यांच्या संवर्धनावर नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.

राज्यात छोटय़ा-मोठय़ा आणि मध्यम आकाराची एकूण नऊ प्राणिसंग्रहालये असून बचावलेल्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी उभारलेली चार बचाव केंद्रे आहेत. या संस्थांवर नियंत्रण आणि प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाबरोबरच दीड वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला आहे. नुकताच जाहीर झालेल्या ‘सीझेडए’च्या अहवालानुसार राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये १६० आणि बचाव केंद्रांमध्ये ७५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५७ पक्षी, १६५  प्राणी आणि १३ सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. तसेच वर्षभरात प्राणिसंग्रहालयांमध्ये ११२ प्राण्यांचा जन्म झाल्याचेही नोंद अहवालात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ या कालावधीत प्राणिसंग्रहालयात बंदिस्त अधिवासात असलेल्या प्रथम आणि द्वितीय दर्जाच्या संरक्षित श्रेणीतील ९८ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाघ, बिबटय़ा, सिंह, हरीण, काळवीट, अस्वल, कोल्हा अशा संरक्षित प्राण्यांबरोबरच मगर, अजगर, सापांच्या काही प्रजातींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालय आणि बचाव केंद्राच्या व्यवस्थापनासंबंधी कठोर नियम बनविण्याचे काम सुरू आहे. यापुढे प्राणिसंग्रहालयातून प्राधिकरणाला देण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्या प्राण्यांच्या मृत्यूबाबत सुस्पष्टता नसेल तर संबंधित संग्रहालयांकडून त्याबाबत खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणी अहवालाद्वारे प्राण्यांचा अधिवास आणि त्यांचा आहाराची माहिती प्रत्येक महिन्यात घेतली जात आहे.    – सुधाकर डोळे, सदस्य सचिव, महाराष्ट्र प्राणिसंग्रहालय प्राधिकरण