04 August 2020

News Flash

२३५ करोनायोद्धय़ांचा मृत्यू

अत्यावश्यक सेवेतील साडेसहा हजार जणांना बाधा

अत्यावश्यक सेवेतील साडेसहा हजार जणांना बाधा

मुंबई : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवेतील कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना लढाईत अक्षरश: आपले प्राण पणाला लावले आहेत. केवळ डॉक्टर, परिचारिका किंवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीच नव्हे तर पोलीस, रेल्वे, बेस्ट, पोस्ट, एसटी, बँक या क्षेत्रांतील २०० हून अधिक करोनायोद्धय़ांनी आतापर्यंत प्राण गमावले आहेत.

करोना टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यापासूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. पालिकेच्या विविध विभागातील दोन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली असून त्यापैकी ८१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सध्या पालिके च्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना करोनाशी संबंधित काम देण्यात आले आहे. त्यामुळे बाधितांमध्ये आरोग्य विभागासोबत अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अग्निशमन दलाचे ११७ जवान आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यापैकी ८ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

टाळेबंदीच्या काटेकोर अमलबजावणीसाठी तुटपुंज्या सुरक्षा साधनांसह रस्त्यावर अहोरात्र तैनात राहिलेल्या मुंबई पोलीस दलालाही या आजाराने ग्रासले आहे. करोना संसर्गामुळे आतापर्यंत ३८ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये बहुतांश पोलीस पन्नाशीपुढील वयाचे आहेत. टाळेबंदीची अंमलबजावणी, गृह किंवा संस्थापक अलगीकरणातील व्यक्तींची चाचपणी, स्थलांतरीत श्रमिकांची पाठवणी आदी महत्वाच्या जबाबदारी हाताळणाऱ्या पोलिसांवर सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष केले गेले. व्यवस्था अपुरी असल्याने लक्षणे आढळलेल्यांच्या चाचण्या रखडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नव्हते. बाधितांचे कुटुंब किंवा संपर्कात आलेल्यांना फक्त विलगीकरण केंद्रात हलविले जात होते. त्यांच्या चाचण्या होत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांच्या संसर्ग आणि मृत्यूत वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.

करोनाचा फटका रेल्वे, बेस्ट, एसटी अशा सार्वजनिक वाहतुकीच्या सेवांतील कर्मचाऱ्यांनाही बसला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ७३५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी ५०९ जण बरे होऊन घरी परतले. मात्र, ७२ कर्मचारी रेल्वेने गमावले. यात मध्य रेल्वेच्या ५३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बेस्टमधील ६७५ कर्मचाऱ्यांपैकी ५१० कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. तर नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झला. एसटी महामंडळातही दोन कर्मचारी करोनामुळे दगावले. एसटीचे एकूण १२७ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली.

१३ बँक कर्मचाऱ्यांचा बळी

‘महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशन’च्या आकडेवारीनुसार करोनामुळे आत्तापर्यंत १३ बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील १२ कर्मचारी मुंबई आणि ठाणे येथील आहेत. टाळेबंदीच्या पहिल्या दिवसांपासून मर्यादीत कर्मचाऱ्यांसह बँका कार्यरत होत्या. मात्र काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांना वाहतूक असुविधांचा सामना करावा लागला. त्यावर अद्यापही पुरेसा तोडगा निघालेला नाही.

डॉक्टरांची झुंज

रुग्णांवर उपचार करण्यासाठी करोनाशी थेट भिडणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्येही करोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरातील लोकमान्य टिळक रुग्णालयात १००, केईएममध्ये ७० आणि नायरमध्ये ५०  आणि इतर पालिका रुग्णालयांतील ३०० डॉक्टर करोनाबाधित झाले आहेत. खासगी रुग्णालयातील १०० हुन अधिक बाधित झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली. परिचरिकांसह बाधित वार्डबॉयची संख्या १५० हून अधिक आहे. मुंबई महानगर प्रदेशात १० हुन अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

टपाल सेवेतील ११ जणांचा मृत्यू

टपाल सेवेतील करोनाबिधितांची संख्या आता शतक पार करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात ९८ टपाल कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३० जण बरे झाले आहेत तर, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ५७ जण विविध रुग्णालयांत सध्या उपचार घेत आहेत. टाळेबंदीच्या काळात आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत असताना त्यांच्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे आणि इतर सामग्री रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याचे काम टपाल सेवा करत आहे. बाधित कर्मचा?ऱ्यांना सरकारी निर्देशांनुसार आर्थिक सहाय्य केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:37 am

Web Title: 235 covid 19 warriors deaths in maharashtra zws 70
Next Stories
1 नववीच्या फेरपरीक्षेवरून शाळा-पालकांत वाद
2 बीकेसी रुग्णालयातील एक हजार रुग्ण करोनामुक्त
3 जुन्या वादातून शेजाऱ्याच्या मुलाचा खून
Just Now!
X