मुंबईत बुधवारी २३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ५० जणांचा मृत्यू झाला. दररोज दोन हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३१ हजारांहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग सध्या १.२८ वर गेला आहे. ऑगस्टमध्ये एक टक्क्यापेक्षाही कमी असलेला हा दर काही विभागांत दीड टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. त्यातही बोरिवली, दहिसर, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम, कांदिवली, वांद्रे पश्चिम, मुलुंड, ग्रॅन्टरोड या भागांत रुग्णवाढ अधिक आहे. येथे दररोज सरासरी १०० रुग्णांची नोंद होत आहे.

बुधवारी २३५२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. तर एका दिवसात १५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १ लाख ३५ हजाराहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण ७७ टक्के आहे.

मुंबईत आतापर्यंत साडेनऊ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. दर दिवशी दहा ते अकरा हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी २० टक्के रुग्णांचे अहवाल बाधित येत आहेत.

प्रत्येक रुग्णाच्या निकटचे संपर्क शोधण्याचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णामागे १५ ते २० संपर्क शोधण्याचे लक्ष्य ठेवल्यामुळे दर दिवशी २५ हजाराहून अधिक संपर्क शोधले जात आहेत. त्यापैकी १५ हजारापर्यंत लोक हे अतिजोखीम गटातील असतात.

ठाणे जिल्ह्य़ात २४ तासांत १,७९५ रुग्ण

जिल्ह्य़ात बुधवारी १ हजार ७९५ नवे करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या १ लाख ५१ हजार २३६ झाली आहे. दिवसभरात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. चोवीस तासांत कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ५३७, नवी मुंबईत ३७५, ठाणे शहरात ३६४, मीरा-भाईंदरमध्ये २००, ठाणे ग्रामीणमध्ये ११८, बदलापुरात ८६, उल्हासनगर शहरात ५८, भिवंडी शहरात ३५ आणि अंबरनाथ शहरात २२ रुग्ण वाढले.