मध्य रेल्वेवर असलेला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा काही प्रमाणात भरून निघणार असून केंद्राकडून झालेल्या भरतीत मध्य रेल्वेच्या वाटय़ाला २३६० चतुर्थश्रेणी कर्मचारी आले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४०० कर्मचारीच अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत. या ४०० पैकीही २०० कर्मचारी दिवा-रोहा मार्गाच्या बळकटीकरणासाठी देण्यात आल्याने मुंबई विभागासाठी फक्त २०० कर्मचारी उपलब्ध आहेत. रेल्वेच्या अनेक प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या अभियांत्रिकी विभागात अजूनही तब्बल ७८० पदे रिक्त आहेत.
मध्य रेल्वेवर सध्या डीसी-एसी परिवर्तनाचे महत्त्वाचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वेरूळांची पातळी खाली करण्याचे काम अभियांत्रिकी विभागाकडे आहे. त्याशिवाय मुंबई-गोवा मार्गावर अतिजलद गाडी चालवण्यासाठी रूळांच्या बळकटीकरणाचे कामही याच विभागाकडे आहे. तसेच दैनंदिन वाहतुकीसाठीही या अभियांत्रिकी विभागाला प्रचंड काम करावे लागते. दर रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकच्या कामांमध्येही अभियांत्रिकी आणि विद्युत विभागाचा वाटा मोठा असतो.
असे असताना मध्य रेल्वेच्या वाटय़ाला आलेल्या २३६० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपैकी फक्त ४०० कर्मचारी या विभागाच्या दिमतीला देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. या ४०० कर्मचाऱ्यांपैकी २०० कर्मचारी दिवा-रोहा या मार्गावर रेल्वेमार्ग बळकटीकरणाचे काम करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. मुंबई-गोवा अतिजलद मार्गासाठी हे काम महत्त्वाचे आहे. या मार्गावर सध्याच्या ८० किमी प्रतितास या वेगाऐवजी १६० किमी प्रतितास वेगाने गाडी धावणार आहे. त्याशिवाय अभियांत्रिकी विभागातील ३५० कर्मचारी माटुंग्याच्या कारशेडमध्ये देण्याचे आदेशही या विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच ७८० पदे रिक्त असलेल्या या विभागात ३५० पदांचा खड्डा पडणार आहे.
मध्य रेल्वेच्या धोरणानुसार ४०० कर्मचारी या विभागात आले, तरी प्रत्यक्षात २०० कर्मचारीच प्रत्यक्ष मुंबई विभागात उपलब्ध असतील. त्यामुळे एकूण रिक्त जागांची संख्या ८५०च्या वर पोहोचणार आहे. या रिक्त जागांबाबत अधिकारी वर्ग नाराज आहे. रेल्वे प्रशासन आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागांत पाठवत आहे. मात्र त्याजागी आमच्या विभागाला आवश्यक कर्मचाऱ्यांचे बळ मिळत नाही. ही स्थिती अशीच राहिल्यास काम करणे कठीण जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.