कुंदन शाह, सईद मिर्झा, अरूंधती रॉय यांच्यासह २४ जणांकडून राष्ट्रीय पुरस्कार परत
‘पुरस्कार वापसी’ची लाट साहित्यिकांपासून चित्रपटकर्मींपर्यंत पोहोचली असून गुरूवारी कुंदन शहांसारख्या दिग्गज चित्रपटकर्मीपासून बुकर पारितोषिक विजेत्या अरूंधती रॉय यांच्यासह २४ चित्रपटकर्मीनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार परत केले. मात्र, चित्रपटकर्मीच्या या ‘पुरस्कार वापसी’ चळवळीविरोधात चित्रपटसृष्टीतील त्यांच्याच सहकाऱ्यांनी नवी आघाडी उभी केली असल्याने बॉलिवूडमध्येच यावरून दोन गट निर्माण झाले आहेत.
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन हे गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या पलिकडे जात एकूणच अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातो आहे त्याविरोधात असल्याचे मत व्यक्त करत २४ चित्रपटकर्मीनी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले पुरस्कार परत केले. ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या कुंदन शाह यांनी आपल्याला मिळालेला एकमेव राष्ट्रीय पुरस्कार परत करताना दु:ख होत असल्याचे म्हटले आहे. मात्र, ज्या ‘एफटीआयआय’ संस्थेने आपल्याला घडवले त्याचे आपण ऋणी असून संस्थेबाबतीत सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्यानेच आपण या ‘पुरस्कार वापसी’ मोहिमेत सामील झाल्याचे कुंदन शाह यांनी सांगितले. तर ‘एफटीआयआय’चेच माजी विद्यार्थी असलेल्या सईद मिर्झा यांच्यासह इतरही दिग्दर्शकांनी आपले पुरस्कार परत केले. यात मधुश्री दत्ता, तपन बोस, दिग्दर्शक अमिताभ भट्टाचार्य, वीरेंद्र सैनी, अन्वर जमाल, मनोज लोबो, प्रदीप कृष्णन अशा चित्रपटकर्मीचा समावेश आहे. बुकर पुरस्कार विजेत्या अरूंधती रॉय पत्रकार परिषदेसाठी उपस्थित नव्हत्या. मात्र, आपली पुरस्कार वापसी ही असहिष्णूते विरोधात नाही. तर देशातील बुध्दिमत्तेवर जो हल्ला केला जातो आहे त्याविरोधात असल्याचे पत्राद्वारे स्पष्ट केले.
बॉलिवूडमधून टीका
अनुपम खेर, अनिल कपूर , मधुर भांडारकर यांसारख्या बॉलिवूडजनांनी ‘पुरस्कार वापसी’ मोहिमेत सामील झालेल्या चित्रपटकर्मीवक कडाडून टीका केली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार परत करणे म्हणजे पंतप्रधानांचाच नाहीतर तुम्हाला सन्मान देणाऱ्या परीक्षकांचा, मान्यवरांचाही अनादर असल्याचे मत या बॉलिवूडजनांनी व्यक्त केले आहे.