मुलुंड, वांद्रेतील प्रायोगिक प्रकल्पातील निष्कर्ष; पाणीपुरवठय़ाच्या तासांत वाढ करणेच शक्य

गेली दहाहून अधिक वर्षे मुंबईकरांना दाखवलेले २४ तास पाणीपुरवठय़ाचे स्वप्न नजीकच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची कोणतीही शक्यता नाही. मुलुंड व वांद्रे येथील वस्तीत २४ तास पाणीपुरवठय़ाचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यासाठी गेली तीन वर्षे काम केल्यावर आता या ठिकाणी केवळ पाणीपुरवठय़ाच्या तासांमध्ये वाढ होऊ शकेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत २००७ वर्षांच्या आधीपासून घोषणा सुरू आहेत. या घोषणेवरून निवडणुकाही लढवल्या गेल्या. संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मुलुंड व वांद्रे येथे प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी २०१४ मध्ये कामाला सुरुवात झाली. या कामासाठी ३०० कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज होता. हे काम वर्षभरात पूर्ण होऊन २०१९ मध्ये संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू होईल, असे प्रशासनाचे मत होते. प्रत्यक्षात प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यासाठीच २०१८ साल उजाडले असून पहिल्या टप्प्याचे काम ऑगस्ट २०१८ पर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. वांद्रे उपनगरात वेगवेगळ्या व्यासांच्या जलवाहिन्या टाकण्यासंबंधीचा ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव बुधवारी चर्चेला आला तेव्हा स्थायी समितीच्या सदस्यांनी पाणीपुरवठय़ाविषयी प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी २९ नोव्हेंबर रोजी याच प्रकारचा प्रस्ताव आला होता तेव्हा मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण होण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये प्रायोगिक प्रकल्पासाठीचे काम पूर्ण होईल तेव्हा या भागात पाणीपुरवठय़ाचा कालावधी वाढेल, हे २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पाऊल असेल, असे मुखर्जी म्हणाले. त्यामुळे ऑगस्टनंतरही या दोन्ही उपनगरांत २४ तास पाणीपुरवठय़ाचे स्वप्न प्रत्यक्षात येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

२४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलणे, आवश्यक येथे अधिक वाहिन्या टाकणे तसेच सध्याच्या जलवाहिन्या यंत्रणेचे मॅपिंग करणे आवश्यक आहे. जमिनीखालील जलवाहिन्यांच्या जाळ्यांचा नकाशा करणेच जलविभागाला डोईजड झाले आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा दाब नियंत्रित ठेवण्यासाठी जलवाहिन्यांमध्ये बसवण्याच्या झडपांचे कामही रखडले होते. उंचसखल भाग, गरीब वस्ती, जुन्या जलवाहिन्या, अनेक जलवाहिन्यांचे एकत्रीकरण यामुळेही २४ तास पाणीपुरवठा नजीकच्या काळात शक्य नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या मुंबईकरांना तीन तास पाणीपुरवठा होतो. वांद्रे व मुलुंड येथे यापेक्षा जास्त वेळ पुरवठा होणार असून रहिवाशांना पुरेसे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठय़ाचे स्वप्न आणि वास्तव

* २०१९ पर्यंत संपूर्ण शहरात २४ तास पाणीपुरवठय़ाचे लक्ष्य होते.

* शुद्ध पाणी, पाणीगळती थांबवणे, जलवाहिन्यांच्या जाळ्याचा जीआयएस नकाशा, ग्राहकांची नोंदणी आणि ग्राहक सेवा व्यवस्थापन अशा सेवाही देण्याचा विचार होता.

* प्रायोगिक प्रकल्पासाठी मुलुंड व वांद्रे येथे २०१४ मध्ये काम सुरू झाले.

* या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये खर्च

* जलवाहिन्यांच्या जाळ्याचे नकाशे तयार करण्यासाठीच दीड वर्ष लागले.

* सुरुवातीला २०१७, त्यानंतर मार्च २०१८, जून २०१८ आणि आता नवी तारीख ऑगस्ट २०१८.

* वांद्रे व मुलुंडमध्ये २४ तास नाही तर त्या दिशेने प्रयत्न होणार असल्याची प्रशासनाची सारवासारव.