बार कौन्सिलचा निर्णय; मुंबईतील केसी आणि वाडिया महाविद्यालयांचाही समावेश

शैक्षणिक वर्ष २०१६-१७मध्ये राज्यातील २४ विधि महाविद्यालयांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय बार काऊन्सिल आफ इंडियाने घेतला आहे. या महाविद्यालयांची यादी आज, बुधवारी जाहीर करण्यात येणार असून त्यात मुंबईतील केसी विधि  महाविद्यालय, वाडिया, जितेंद्र चव्हाण विधि महाविद्यालयाचा समावेश असल्याचे सूत्रांकडून समजते.

राज्यातील १२७ विधि महाविद्यालयांची पात्रता तपासण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यांची दिल्लीत बैठक सुरू होती. या बैठकीत सर्व महाविद्यालये पात्रता निकषामध्ये बसत आहेत किंवा कसे, याची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर अखेर ६३ महाविद्यालयांना प्रवेशास परवानगी देण्याचा निर्णय कौन्सिलने घेतला. तर ४० महाविद्यालयांचा निर्णय राखून ठेवला आहे. ही ४० महाविद्यालये ज्या निकषांमध्ये कमी पडत आहेत त्या निकषांची पूर्तता करून त्यांनी १९ ऑगस्टपर्यंत पूर्तता अहवाल कौन्सिलकडे सादर करावयाचा आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यासाठी २० ऑगस्ट रोजी कौन्सिलची पुन्हा विशेष बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत या महाविद्यालयांचे भवितव्य अवलंबून असेल. याचबरोबर जी महाविद्यालये शैक्षणिक निकष आणि शिक्षकांसाठी आवश्यक निकष पाळण्यास अपयशी ठरली आहेत अशा २४ महाविद्यालयांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  यावर्षी विधि अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतल्यामुळे सामान्यपणे जुन-जुलैमध्ये सुरू होणारी महाविद्यालये अजूनही सुरू होऊ शकली नाहीत. यामुळे हजारो पालक व विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता महाविद्यालयांना प्रवेशबंदी आल्यामुळे जागाही कमी होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे.