जानेवारीअखेरीस हार्बर, ट्रान्स हार्बरवर २४ नवीन लोकल फेऱ्या

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी २०१८मध्ये नव्या लोकल आणि वाढीव फेऱ्या, नवीन पादचारी पूल तसेच मोठय़ा प्रमाणात सरकते जिने सेवेत येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर आठवडाभरापूर्वीच सेवेत दाखल झालेल्या वातानुकूलित लोकल गाडीच्या सहा फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल केला जात आहे. १ जानेवारीपासून वातानुकूलित लोकल गाडीच्या चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान १२ नवीन फेऱ्यांचे वेळापत्रक लागू होईल. या वेळापत्रकाबरोबरच जानेवारी महिन्यात गोरेगावपर्यंत हार्बर आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवर २४ नवीन लोकल फेऱ्याही सुरू होतील. महत्त्वाची बाब म्हणजे एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने लष्करामार्फत तीन पादचारी पूल उभारले जाणार आहेत. तीनही पुलांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

जानेवारी २०१८ मध्ये हार्बर आणि ट्रान्स हार्बर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेला अंधेरी ते गोरेगाव हार्बर विस्तार प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येईल. नवीन मार्ग पूर्णपणे तयार असून तो खुला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून फक्त मंजुरीची आवशक्ता आहे. त्यामुळे जवळपास २३ लोकल फेऱ्यांचा विस्तार गोरेगावपर्यंत होणार आहे. त्याव्यतिरिक्त हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांसाठीही २४ नवीन लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. सुरुवातीला नवीन वर्षांच्या १ जानेवारीपासून अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्याची योजना होती. परंतु हार्बरवर बेलापूरजवळच सीवूड-उरण नवीन मार्गाचे सुरू असलेले काम, सध्या तांत्रिक बिघाडाचा करावा लागत असलेला सामना इत्यादी कारणांमुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस वेळापत्रक लागू केले जाणार आहे.

लष्कराकडून तीन पूल

एल्फिन्स्टन रोड स्थानकात घडलेल्या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने तीन पूल लष्कराकडून बांधून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परेल स्थानकातील पादचारी पुलाचे एल्फिन्स्टन रोड स्थानकापर्यंत विस्तार, करी रोड स्थानकात पूल आणि अंबिवली स्थानकातही एक पूल उभारण्यात येणार असून जानेवारी महिन्यापर्यंत पूल उभारण्याचे उद्दिष्ट आहे

मार्चपर्यंत आठ मेधा लोकल

संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेली नवीन मेधा लोकल गाडी पश्चिम रेल्वेत दाखल होत आहे. १३ लोकलपैकी पाच लोकल दाखल झाल्या असून आणखी आठ लोकल मार्च महिन्यापर्यंत येतील.

नवीन पूल आणि विस्तार

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांवर नवीन पूल बांधतानाच पुलाची रुंदीही वाढवण्यात येणार आहे. वर्षभरात पश्चिम रेल्वेवर १० नवीन पूल उभारण्यात येणार असून त्यांचे काम सुरू आहे.

वातानुकूलित लोकल सेवेत

हार्बर आणि ट्रान्स हार्बरबरोबरच पश्चिम रेल्वे प्रवाशांनाही नवीन वर्ष दिलासा देणारे आहे. वातानुकूलित लोकल गाडीच्या सहा ऐवजी बारा लोकल फेऱ्या सुरू केल्या जात आहेत. या फेऱ्या विरार ते चर्चगेटसाठी चार, बोरिवली ते चर्चगेटसाठी दोन, चर्चगेट ते विरार चार फेऱ्या, चर्चगेट ते बोरिवली एक याप्रमाणे असतील. वातानुकूलित लोकलला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असून त्याबदल्यात सध्याच्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.