इव्हेंटमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीने १५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मालाडमध्ये घडली. अर्पिता तिवारी असे या तरुणीचे नाव असून तिने आत्महत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

मिरा रोड येथे राहणारी अर्पिता तिवारी आणि तिचा प्रियकर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास मालाडमधील मित्राच्या घरी गेले. त्यांचा मित्र महाकाली रोडवरील इमारतीमध्ये १५ व्या मजल्यावर राहतो. पहाटे चारपर्यंत त्यांनी पार्टी केली. सकाळी सातच्या सुमारास अर्पिताच्या एका मित्राला जाग आली. मात्र अर्पिता घरात  दिसली नाही. त्याने घाबरुन अर्पिताच्या प्रियकराला उठवले. बाथरुमचा दरवाजा बंद असल्याने ती आंघोळ करत असावी, असे त्यांना वाटत होते. मात्र आतून काहीच आवाज न आल्याने त्यांना शंका आली. त्यांनी घरातून बाथरुमच्या दरवाज्याची चावी शोधली आणि दरवाजा उघडला. अर्पिता तिथेही नव्हती. मात्र खिडकीच्या काचा काढलेल्या होत्या. त्यांनी इमारतीच्या आवारात तिचा शोध घेतला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तिचा मृतदेह सापडला.

अर्पिता आणि तिच्या प्रियकराचे गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबीयांनाही याची माहिती होती. लवकरच दोघे लग्न देखील करणार होते. अर्पिता आणि त्याच्यात काही वाद झाला का याचा तपास सुरु आहे. घरात उपस्थित असलेली मित्रमंडळी आणि अर्पिताचा मित्र या सर्वांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच अर्पिताचे कॉल रेकॉर्ड, मेसेजस आणि सोशल मीडियावरील अकाऊंट्स याचाही तपास केला जाईल. अर्पिता ही २०१२ पासून इव्हेंटमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करते. नुकतेच तिने स्वतःचे स्टार्ट-अपही सुरु केले होते, असे समजते. अर्पिताने मुंबईतील ख्यातनाम महाविद्यालयातून मास कम्यूनिकेशनचे शिक्षण घेतले होते.