५२ जणांचा मृत्यू, १७६ जण जखमी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : पदपथ आणि रस्त्यांच्या दुरुस्तीनिमित्ताने वारंवार केलेले खोदकाम, सेवा उपयोगिता कंपन्यांच्या कामासाठी वाटेल तसे खोदले जाणारे चर, दुकानांनी, फे रीवाल्यांनी खिळे ठोकून उभ्या केलेल्या टांगण्या, अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी छाटणी अशा विविध कारणांमुळे मुंबईमधील वृक्षसंपदा धोक्यात येऊ लागली आहे. मुंबईमध्ये २०१५ पासून आतापर्यंत वृक्ष उन्मळून पडण्याच्या वा फांद्या तुटून पडण्याच्या तब्बल २४ हजारांहून अधिक घटनांची नोंद पालिका दरबारी झाली. तर या दुर्घटनांमध्ये ५२ जणांना प्राण गमवावे लागले.

गेल्या काही वर्षांमध्ये मुसळधार पावसाच्या तडाख्यात मुंबईमधील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडू लागले आहेत. तर काही वृक्षांच्या फांद्या पडून जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी होत आहे. मात्र वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यात पालिकेला अपयश आले आहे.

वृक्ष उन्मळून पडल्याच्या वा फांद्या तुटून पडल्याच्या सर्वाधिक तक्रारी २०१७ मध्ये पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. या वर्षांत तब्बल ५,७१४ तक्रारी आल्या. या दुर्घटनांमध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले, तर ३७ जण जखमी झाले होते. त्या खालोखाल २०१९ मध्ये ४,९३७ घटनांमध्ये काही वृक्ष पूर्णपणे पडले, तर काही ठिकाणी मोठय़ा फांद्या तुटून वृक्षांची हानी झाली. या वर्षांत अशा दुर्घटनांमध्ये आठ जण मृत्युमुखी पडले, तर ४२ जण जखमी झाले.

मुंबईत बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पालिकेच्या अखत्यारितील १११ वृक्ष, तर खासगी भूखंडावरील १०८ असे एकूण २०९ वृक्ष उन्मळून पडले. तर पालिकेच्या २९, तर खासगी ३६ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. शहरातील १६४, पश्चिम उपनगरातील ३६, तर पूर्व उपनगरातील ३७ वृक्ष उन्मळून पडले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट २०२० या काळात वृक्ष पडण्याच्या ३,०१४ तक्रारी आल्या आणि त्यात नऊ जण जखमी झाले.

पावसाळ्यात उन्मळून पडणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याची मागणी होते. मात्र ही बाब खूप खर्चीक आणि भरवशाची नसल्याने उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या जागी देशी झाडाची लागवड करणे सोयीस्कर ठरते. अशा घटना टाळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी करणे गरजेचे आहे, असे  तज्ज्ञांचे मत आहे.

वृक्ष दुर्घटनांच्या तक्रारी

वर्ष                       २०१५             २०१६          २०१७              २०१८      २०१९           २०२०     (ऑगस्टपर्यंत)

तक्रारी                   ३,३०३           ३,८९४         ५,७१४            ३,१६९      ४,९३७         ३,०१४

मृत्यू                      १०                ४                  ६                    ६            ८                 ०

जखमी                   ४०               ४८              ३७                     ३०           ४२             ९

 

मुंबईमधील पदपथ, रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांच्या वेळी झाडांची मुळे दुखावतात. त्याने झाडे नाजूक बनतात. मुंबईत रस्त्याखाली वाळू आहे. अशी अनेक कारणे झाडे पडण्यामागे आहेत. मात्र उन्मळून पडणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण महागडे ठरू शकते. पुनर्रोपण करण्यापूर्वी झाडाच्या मुळाला किती मार बसला आहे, किती प्रमाणात तुटली आहेत, खराब झाली आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

– सी. एस. लट्ट, वृक्षतज्ज्ञ