टाळेबंदीत मुंबई, ठाणे विभागात एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या बस सेवेला २ हजार ४५१ कर्मचाऱ्यांनी ‘दांडी’ मारली आहे. दांडी मारणाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी, तसेच हंगामी व रोजंदारीवरील एसटी चालक, वाहक आणि चालक तथा वाहकांचा समावेश आहे. त्यामुळे नाईलाजास्तव महामंडळाला राज्यातील विविध आगारातून एक हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहक बोलवावे लागल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

डॉक्टर, परिचारिका व अन्य वैद्याकीय कर्मचारी, पालिका व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून मुंबई, ठाण्यात बस सेवा दिली जात आहे. ही सेवा देणाऱ्या चालक-वाहकांना करोनाची लागण होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर दिले आहे. याशिवाय त्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ताही जाहिर केला आहे. तरीही अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी अनेकांनी करोनाच्याधास्तीने या सेवेकडे पाठ फिरवली आहे. आपले कर्तव्य बजावण्यासाठी कामावर येण्याचे आवाहनदेखील महामंडळाने केले, याशिवाय कारवाईचा बडगा उचलण्याचा इशाराही दिला. तरीही काही कर्मचारी गैरहजरच राहिले.

टाळेबंदी सुरू झाल्यानंतर ते आतापर्यंत मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या मुंबई विभागाच्या आगारातील ६४८ आणि ठाणे खोपट, वंदना, भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा या ठाणे विभागाच्या आगारातील १ हजार ८०३ चालक, वाहक आणि चालक तथा वाहक अत्यावश्यक सेवेसाठी गैरहजर राहिले. दांडी मारणाऱ्यांमध्ये कायमस्वरुपी चालक-वाहकांची संख्याच अधिक असून मुंबई विभागातील ४६३ जणांनी दांडीच मारली आहे. मुंबई सेन्ट्रल आणि परळ आगारातील कर्मचारी पुढे आहेत.

त्यापाठोपाठ ठाणे, भिवंडी, कल्याणमधीलही या कर्मचाऱ्यांनीही कामावर गैरहजर राहणेच पसंत केले. अत्यावश्यक सेवा देतानाच कामगारांनाही राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचे काम महामंडळाकडून केले जात आहे. यात ठाणे आणि मुंबई विभागातूनही कामगारांसाठी एसटी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा ताणही असल्याने महामंडळाला नाईलाजास्तव राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सातार इत्यादी भागातील जवळपास एक हजारपेक्षा जास्त चालक आणि वाहकांना बोलवावे लागले आहे.

बडतर्फीचा बडगा उगारणार?

जे चालक-वाहक गैरहजर राहिले आहेत, यातील काहींचे वेतन थांबवण्याची कारवाई महामंडळाने केली आहे. यामध्ये हंगामी आणि रोजंदारीवर असलेल्यांवर बडतर्फीचाही बडगा उचलण्याचा विचार महामंडळाकडून सुरु आहे.

कायमस्वरुपी नोकरीतील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी अधिक

मुंबई विभागात ८६३ चालक, वाहक आणि चालक तथा वाहक हे कायमस्वरुपी आहेत. परंतु गैरहजर राहणाऱ्यांमध्ये त्यांचीच संख्या अधिक आहे. आपले कर्तव्य न बजावता अशाप्रकारे गैरहजर राहणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.