अभिनेता संजय दत्त याची शिक्षा माफ करण्याला सुमारे २५ नागरिकांनी आणि संघटनांनी विरोध केलाय. तशा आशयाचे निवेदन त्यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे दिले आहे. संजय दत्तच्या शिक्षा माफी संदर्भात राज्यपालांना एकूण ६० निवेदन मिळाली आहेत. ती सर्व त्यांनी राज्याच्या गृह मंत्रालयाकडे अभिप्रायासाठी पाठविली आहेत.
१९९३च्या बॉबम्स्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची शिक्षा राज्यपालांनी आपला विशेषाधिकार वापरून माफ करावी, अशी मागणी काही व्यक्तींनी केली. त्याचवेळी शिक्षा माफ करू नये, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात आलीये. यासंदर्भातील निवेदने राज्यपालांकडे पाठविण्यात आली आहेत. राज्यपाल कार्यालयाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी ही सर्व निवेदने गृह मंत्रालयाकडे पाठविली आहेत, असे राजभवनातील प्रवक्त्याने सांगितले.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू, खासदार जयाप्रदा, समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनीही संजय दत्तची शिक्षा माफ करण्याची मागणी राज्यपालाकडे केली आहे.