17 January 2021

News Flash

पालिका मुख्यालय आपत्कालीन विभागातील २५ करोना मुक्त कर्मचारी तात्काळ सेवेत दाखल!

३१ कर्मचाऱ्यांना झाली होती करोनाची लागण

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

मुंबई: पूर असो की नैसर्गिक आपत्ती असो अगदी आताची करोनास्थितीसाठी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे महत्व वादातीत आहे. करोनाच्या लढाईत या विभागातील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती मात्र उपचारानंतर यातील २५ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

महाराष्ट्रात पहिला करोना रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आला तेव्हापासून आपत्कालीन व्यवस्थापन विभाग कामाला लागला. रुग्णालयांशी संपर्क, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून झालेली सुरुवात पुढे वाढत रुग्णांकडून येणारे दूरध्वनी लक्षात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यास मदत करण्यासह आवश्यक ती माहिती गोळा करण्याचे काम चोवीस तास या विभागाकडून सुरू आहे. यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या १९१६ या दूरध्वनी क्रमांकाला गेल्या तीन महिन्यात अपवादानेच विश्रांती मिळाली असेल गेल्या तीन महिन्यात करोना रुग्णांच्या मदतीसह वेगवेगळ्या कामांसाठी एक लाख ५४ हजार ५८६ दूरध्वनी या विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतले.

करोना काळात रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी येथे डॉक्टरही तैनात ठेवण्यात आले होते. रुग्णांच्या तसेच मुंबईकरांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना न कंटाळता येथील कर्मचारी उत्तर देत आहेत. एरवीच्या वेळीही १९१६ या दूरध्वनीवर अनधिकृत बांधकाम, अपघात, कचरा साठाला तसेच रस्त्यावरील खड्ड्यांपासून ते किरकोळ तक्रारी पर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी आपत्कालीन विभागाचे फोन खणखणत असतात.

मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी व्हीएचएफ हाय फ्रिक्वेन्सी बिनतारी यंत्रणा कार्यरत आहेत. मुंबईतील २४ विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष, तीन प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालये यांना जोडणार्या ५५ हॉट लाईन असून मुंबईतील विविध घडामोडी टिपण्यासाठी दूरचित्रवाणी संच तसेच मुंबई पोलिसांचे ५३०८ सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक पोलिसांचे २३१ सीसीटीव्ही कॅमेरे व पर्जन्य जलवाहिनीवर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही याच्यावर लक्ष ठेवता यावे यासाठी व्हिडिओ वॉल तैनात आहे. मुंबईतील कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग ही मुंबई महापालिकेची एक ताकद असून याच्या माध्यमातून गतिमान निर्णय घेण्यास मोठी मदत होते, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

करोनाच्या काळात येथील कर्मचारी अविश्रांत काम करत होते. विभागात एकूण ६७ कर्मचारी असून यातील ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होऊनही आपत्कालीन विभाग व नियंत्रण कक्षच्या कामावर कधी परिणाम होऊ दिला नाही, असे विभागाचे सल्लागार महेश नार्वेकर यांनी सांगितले. विभागाच्या हंगामी प्रमुख रश्मी लोखंडे यांच्यासह ३१ कर्मचार्यांना करोनाची लागण झाली होती. यातील २५ कर्मचारी बरे होताच पुन्हा कामावर हजर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सल्लागार महेश नार्वेकर यांनाही चौदा दिवस विलगीकरणाखाली राहावे लागले. मात्र नियंत्रण कक्षाचे व विभागाचे महत्त्व लक्षात घेऊन बरे होताच आमचे सर्व कर्मचारी तात्काळ कामावर येऊन कामाप्रतीची कर्तव्य दक्षता दाखवून दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 7:16 pm

Web Title: 25 mahapalika staff corona free joined the duty scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर बोलावली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक
2 फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनीने कर्मचाऱ्यांचे ‘फ्युचर’ केले सुखकारक
3 मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Just Now!
X