News Flash

अग्निशमन दलावर ताण

अधिकारी, कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त

अधिकारी, कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे रिक्त

मुंबई : आग किंवा इमारत पडण्यासारख्या दुर्घटना झाल्यास बचावकार्य करणाऱ्या अग्निशमन दलातील तब्बल २५ टक्के पदे रिक्त असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दुर्घटनाग्रस्त ठिकाणी थेट कारवाई करण्यासाठी अग्निशमन दलात १४ प्रकारची ३,६९४ पदे आहेत. यापैकी २,७६० पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित ९३४ पदे रिक्त आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होणाऱ्या अग्निशामकांची संख्या मोठी आहे. अग्निशमन दलात २,३४० अग्निशामकांची पदे असून त्यापैकी ६०४ पदे रिक्त आहेत, तर चालक, यंत्रचालकांची १५९ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर प्रमुख अग्निशामकांची ६९, दुय्यम अधिकाऱ्यांची ६६, वरिष्ठ केंद्र अधिकाऱ्यांची १७, केंद्र अधिकाऱ्यांची १० पदे रिक्त आहेत. उपमुख्य तांत्रिक अधिकारी पदही रिक्तच आहे. अग्निशमन दलाच्या कार्यशाळेत २९ प्रकारची १२५ पदे असून त्यापैकी ६२ पदे रिक्त आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून अग्निशमन दलातील रिक्त पदांची माहिती मागविली होती. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल २५ टक्के पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईमधील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. पुनर्विकासात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत, तर बहुमजली झोपडय़ा उभ्या राहात असल्याने झोपडपट्टय़ा, वस्त्यांचे प्रश्नही दिवसेंदिवस अवघड बनत आहेत. इमारत कोसळण्याची वा आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अग्निशमन दलासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत अग्निशमन दल अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र २५ टक्के कमी मनुष्यबळासह अग्निशमन दल कार्यरत आहे. त्यामुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने रिक्त पदे भरावी आणि अग्निशमन दलाला बळ द्यावे, अशी मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:06 am

Web Title: 25 percent of the posts vacant in mumbai fire brigade department zws 70
Next Stories
1 उद्वाहनाच्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू
2 पर्यटन कंपन्यांकडून ‘वर्केशन’ पॅकेज
3 ड्रग प्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी – सचिन सावंत
Just Now!
X