30 May 2020

News Flash

सागरी सेतूवर ‘फास्टॅग’ सुसाट

वांद्रे-वरळी सी-लिंकवर मागील महिन्यात २४ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती.

२५ टक्के वाहनांकडून सुविधेचा वापर; मुंबईतील अन्य टोलनाक्यांची प्रतीक्षा कायम

मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंकवरील फास्टॅगच्या व्यवहारात महिनाभरात सात हजारांनी वाढ झाली आहे. सी-लिंकवर टोलच्या एकूण व्यवहारापैकी एक चतुर्थाश व्यवहारासाठी फास्टॅगचा वापर होत आहे. मात्र मुंबईच्या वेशीवरील इतर पाच टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणेसाठी लागणारे सेन्सर करोनामुळे थायलंडमधून येण्यास विलंब होत असल्यामुळे त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वांद्रे-वरळी सी-लिंकवर मागील महिन्यात २४ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. फास्टॅगपूर्वी ईटीसी मार्गिकेवर दिवसाला सुमारे दोन हजार व्यवहार होत असत. फास्टॅग यंत्रणा कार्यरत केल्यानंतर अनेक वाहनचालकांनी फास्टॅगला पसंती दिल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढाव्यामध्ये  वांद्रे-वरळी सी लिंकवर दिवसाला एकूण नऊ हजार ३११ व्यवहार हे फास्टॅगच्या माध्यमातून झाल्याचे, महामंडळाचे सह-संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

सी-लिंकवर एका दिवसात टोल नाक्यावर सुमारे चाळीस हजार व्यवहार होत असून, फास्टॅगला प्रतिसाद वाढत असून, साधारण एक चतुर्थाश व्यवहारांसाठी फास्टॅगचा वापर होत आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर सध्या पहिल्या टप्प्यात सहा मार्गिका फास्टॅगसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. सध्याचा वाढता प्रतिसाद पाहता भविष्यात आणखीन मार्गिका राखीव करण्यावर भर असेल असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. गेल्या सात दिवसात घेतलेल्या आढाव्यात दोन वेळा रक्कम कापली जाण्याच्या केवळ सहा घटना झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहतूकदारही आग्रही

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या पाच ठिकाणी पथकर नाके आहेत. या सर्व ठिकाणी फास्टॅग यंत्रणेची चाचणी सुरू आहे. सुरुवातीच्या टप्प्यात नाक्यांवरील काही मार्गिकाच फास्टॅगसाठी राखीव ठेवल्या जातील, त्यानंतर प्रतिसादानुसार मार्गिकांमध्ये वाढ केली जाईल. फास्टॅग सुविधा केवळ राष्ट्रीय महामार्गासाठी असली तरी वाहतूकदारांच्या काही संघटनांनीदेखील मुंबईच्या पथकर नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.

करोनामुळे सेन्सरना विलंब

मुंबईच्या वेशीवरील पाच टोल नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. फास्टॅगसाठी आवश्यक असणारे सेन्सर्स हे थायलंडहून आयात करावे लागतात. सध्या करोनाच्या प्रभावामुळे आग्नेय अशियातून होणाऱ्या आयातीवर परिणाम झाला असून हे सेन्सर्स मिळण्यास विलंब लागत असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्च महिन्याच्या सुरुवातीस सेन्सर्स उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतर चाचण्या घेऊन महिनाभरात पाचही टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित होईल,  अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 3:17 am

Web Title: 25 percent of vehicles on worli bandra sea link use fastag facility zws 70
Next Stories
1 शारदेच्या झुंबराचे शब्द अद्भुत लोलक
2 नव्या कररचनेनुसार आज गुंतवणूकदारांना मार्गदर्शन
3 १५ हजार ३५८ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी
Just Now!
X