मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणी पातळी खालावली आहे. सातही धरणांमध्ये क्षमतेच्या तुलनेत फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षातील आकडेवारी पाहता हा एप्रिल महिन्यातील निच्चांक आहे. मात्र महापालिका अधिकारी उन्हाळ्यात पाण्याची कोणतीही समस्या उभी राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत आहेत. पण सर्वात मोठी काळजी करण्याची गोष्ट म्हणजे हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटसारख्या खासगी संस्थांनी यावेळी कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईला ज्या सात धरणांमधून पाणी मिळतं त्यामध्ये भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि अप्पर वैतरणा यांचा समावेश आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात धरणांमध्ये एकूण ३९ टक्के पाणीसाठा होता, जो यावर्षी २५ वर पोहोचला आहे. अप्पर वैतरणा आणि विहार धरणांमध्ये २० टक्के पाणीसाठा असून, तुलसी धरणात ४२ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २६ टक्के पाणीसाठा आहे.

आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत अशी माहिती एका महापालिका अधिकाऱ्याने दिली आहे. गतवर्षी कमी पाऊस झाल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी पुढील पावसाळा येईपर्यंत पाणी राखून ठेवण्याचं धोरण आखलं होतं. कॅचमेंट भागात जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला होता, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने दांडी मारली होती. अत्यंत गरज लागल्यास भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांमध्ये राखीव ठेवण्यात आलेलं पाणी वापरण्यात येणार आहे.

यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे, अप्पर वैतरणा हा महापालिकेचा कॅचमेंट परिसर असून भातसा धरण ठाणे, भिवंडी यासारख्या महापालिकांसोबत वाटून घेण्यात आलेलं आहे. यामुळे भातसामधील पाणी वापरण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे.