मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) अकरावीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ४३ हजार ५४९ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत त्यांच्या प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. वाणिज्य शाखेला प्रवेश मिळालेल्या तब्बल १,०४,१८१ विद्यार्थ्यांपैकी फारच थोडय़ा म्हणजे फक्त २१,४२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्याने या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना कुठेच प्रवेश मिळू शकलेला नाही.
विज्ञान शाखेची कटऑफ गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही साठय़े महाविद्यालयाची सर्वात जास्त राहिली आहे. त्या खालोखाल रूपारेल, रूईया, पाटकर या महाविद्यालयांकडे विज्ञान शाखेसाठी गुणवंतांचा कल आहे. तर कला शाखेसाठी झेवियर्स, रूईया या महाविद्यालयांकडे गुणवतांचा कल आहे. कला शाखेच्या १३,६०३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तर विज्ञानाच्या ५४,२७१ पैकी १४,१२६ विद्यार्थ्यांना आपल्या सर्वोत्तम आवडीच्या कनिष्ठ महाविद्यालयात संधी मिळाली आहे.
दुसरी यादी ३० जूनला
पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५० रूपये शुल्क भरून २४ ते २६जून दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान प्रवेश निश्चित करायचे आहेत. बेटरमेंट हवी असेल त्यांनाही शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ३० जूनला सायंकाळी ५ वाजता दुसरी प्रवेश यादी जाहीर होईल.