२५ लसीकरण केंद्रे बंद; बीकेसीतील केंद्रावर जेमतेम ४०० कुप्या शिल्लक

मुंबई : दररोज सरासरी साठ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण करणाऱ्या मुंबईत गुरुवारपासून लसटंचाई निर्माण झाली आहे. मुंबईतील ११८ केंद्रांपैकी जवळपास २७ केंद्रे गुरुवारी लशीच्या कुप्या उपलब्ध न झाल्याने बंद ठेवावी लागली. तर अन्य केंद्रांवरही जेमतेम दिवस-दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. बीकेसीतील पालिकेच्या जम्बो लसीकरण केंद्रात तर केवळ चारशे नागरिकांचे लसीकरण होईल, इतकाच साठा राहिला आहे. परिणामी लसीकरणासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना निराश मनाने आणि करोनाची धास्ती घेऊनच घरी परतावे लागत आहे.

मुंबईत लसीकरणासाठी ११८ केंद्रे चालवण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून सर्वच केंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक लसीकरण होत आहे. सरकारने ४५पेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिल्यामुळे लसीकरणाकडे ओघ वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ६० हजारांहून अधिक नागरिकांचे दररोज लसीकरण होत आहे. त्यामुळे लशीचा साठा जवळपास संपला आहे. त्यामुळेच गुरुवारी मुंबईतील सायन रुग्णालयासह २५ लसीकरण के ंद्रे बंद ठेवण्यात आली होती असे समजते.

मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर गुरुवारी १ लाख ३० हजार लोकांचे लसीकरण झाले. आता केवळ ४०० लोकांना पुरेल इतकाच साठ बीकेसी केंद्रावर आहे. पुढील साठा कधीपर्यंत येईल याबाबत डॉक्टरांनी बोलण्यास नकार दिला. धारावी येथील लसीकरण केंद्रावर १५ दिवसात अंदाजे चार हजार लोकांचे लसीकरण झाले. गुरुवारी येथील साठा समाप्त झाला. शुक्रवारी या केंद्रावर लसीकरण होणार नाही. अंधेरीतील कूपर रुग्णालयातील आजवर ४३ हजार लोकांचे लसीकरण झाले. शुक्रवारी एक दिवस पुरेल इतका साठा कूपरमध्ये आहे.

जेजे रुग्णालयात कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा देणे थांबवण्यात आले आहे.  भगवती रुग्णालयात गुरुवारी ६३७ लोकांनी लसीकरण केले. हा या केंद्रावरील शेवटचा दिवस होता. शुक्रवारपासून येथील लसीकरण प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे. जम्बो लसीकरण केंद्रावर दिवसाला दोन ते अडीच हजार लोकांचे लसीकरण केले जाते. अद्याप इथे दोन दिवसांचा साठा आहे.  पोदार रुग्णालयात सायंकाळी २९० लस उपलब्ध होत्या. मात्र त्या गुरुवारी संपल्यामुळे शुक्रवारी केंद्र बंद करावे लागणार आहे. वरळी येथील ईएसआयएस रुग्णालयात  गुरुवारी २ वाजता साठा संपला.  त्यामुळे नागरिकांना परत पाठवावे लागले.

साठा संपण्याच्या भीतीने गर्दी

लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी. लससाठा संपणार असल्याची वार्ता लोकांमध्ये पसरताच गुरुवारी बहुतांशी लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली. अशी माहिती लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून मिळाली. पद्म पोट्टावत्री या ज्येष्ठ नागरिक महिला पतीसह लस घ्यायला आल्या होत्या. मात्र रुग्णालय प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्याने लस संपल्याचे सांगितले. त्यानंतर ही लस मिळेल या अपेक्षेने त्या लसीकरण सुरू असलेल्या केंद्राजवळ जाऊन आल्या. मात्र केंद्राचा दरवाजा बंद पाहून त्या माघारी परतल्या.

भाजपची टीका

कोविड लशीच्या साठय़ाचे सुयोग्य नियोजन महापालिका स्तरावर न झाल्यामुळे सायन रुग्णालयात तसेच इतर अनेक लसीकरण केंद्रांवर कोविड लसीकरण मध्येच थांबवण्याची वेळ आल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी के ला आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे आवश्यक लशींची मागणी आगाऊ नोंदवणे आवश्यक असून पुरेसा लशीचा साठा मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा अशी विनंती शिंदे यांनी महापौर आणि आयुक्तांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

लस साठा संपत असल्याची धास्ती लोकांनी घेतल्याने गुरवारी लसीकरण प्रक्रियेवर खूपच ताण आला. लोकांना समजावूनही ते ऐकत नव्हते. ज्या ठिकाणी दिवसाला दोन ते अडीच हजार लोक येत होते तिथे चार हजारांची गर्दी जमली. लस साठा संपला म्हणजे तो पुन्हा येणार नाही असे नाही, नव्या साठय़ासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. 

डॉ. दीपा श्रीयन, जम्बो लसीकरण केंद्र