राज्यातील नागरिकांसाठीच्या २५० सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून १५० सेवा सध्या ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. तर १५ ऑगस्टपर्यंत २५० सेवा ऑनलाइन करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘नॅसकॉम इंडिया लीडरशिप फोरम’च्या वार्षिक समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासन पारदर्शी पद्धतीने नागरिकांना सेवा देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. अशा प्रकारे सेवा देणे ही राज्य सरकारची जबाबदारीच असल्याने ‘सेवा’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत,’ असे फडणवीस यांनी सांगितले. अनेक अडचणी सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अधिक वापर करणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगून फडणवीस यांनी मेळघाटमध्ये लहान मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ची मदत घेण्यात येत असल्याची माहिती दिली.