मुंबई : मुंबईमध्ये करोनाचे थैमान सुरूच असून गुरुवारी दिवसभरात तब्बल १३८२ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली. तर गुरुवारी ४२ करोनाबाधित मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत ८८२ करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढतोच आहे. करोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक व विलगीकरणात ठेवलेल्यांना जेवणाचा पुरवठा करणारे पालिका कर्मचारीही करोनाबाधित होऊ लागले आहेत. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ७७७ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २२ हजार ४८४ वर पोहोचली आहे. तर गुरुवारी एक हजार ३८२ मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणीच्या अहवालावरुन उघड झाले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २५ हजार ३१७ वर पोहोचली आहे. गुरुवारी ४२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला .

धारावीत १४२५ करोनाबाधित

पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाअंतर्गत येणाऱ्या धारावी, दादर आणि माहीम परिसरातील करोनाबाधित रुग्ण संख्या गुरुवारी १८८० वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या धारावीमध्ये आहे.  गुरुवारी दिवसभरात ४७ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४२५ वर पोहोचली आहे.

‘त्या’ पोलीस शिपायाचा करोनामुळे मृत्यू

राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस हवालदार दिलीप पाटील यांचा मृत्यू करोना संसर्गाने झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. नागपाडा पोलीस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पाटील यांना विषमज्वर होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र १७ मेला मध्यरात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल करून उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

९३ वर्षीय महिलेची करोनावर मात

धैर्य आणि इच्छाशक्ती या बळावर माझगाव येथील ९३ वर्षीय वृद्ध महिलेने करोनावर विजय मिळवला आहे. माझगाव येथे राहणारी ही महिला उच्च रक्तदाबाची रुग्ण असून १७ एप्रिलला तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला सैफी रुग्णालयात दाखल केले होते. १५ दिवस योग्य उपचार आणि आधार दिल्याने ही महिला करोना मुक्त होऊन नुकतीच घरी परतली आहे.