14 July 2020

News Flash

२५ हजार रहिवाशांचे स्थलांतर

प्रशासकीय खबरदारी, वादळाने बदललेली दिशेमुळे मुंबई सुरक्षित

प्रशासकीय खबरदारी, वादळाने बदललेली दिशेमुळे मुंबई सुरक्षित

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन बुधवारी सकाळी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगतचे कोळीवाडे आणि वस्त्यांमधील सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या करोना केंद्रांतील रुग्णांचेही स्थलांतर करण्यात आले. मात्र, वादळाने मुंबईला फारसे नुकसान न पोहोचवता आपली वाट बदलल्याने मुंबईकर सुरक्षित राहिले.

ठिकठिकाणच्या कोळीवाडय़ांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याबाबत पालिका अधिकारी मंगळवारपासून आवाहन करीत होते. स्थानिक नगरसेवकही आपापल्या परीने नागरिकांना स्थलांतर करण्याची विनंती करीत होते. कफ परेडमधील दीपानगर, गणेशनगर, वरळी, वर्सोवा यासह विविध ठिकाणच्या कोळीवाडय़ांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे २५ हजार रहिवाशांची रवानगी पालिकेच्या शाळांमधील तात्पुरत्या निवाऱ्यांत करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या जेवणाचीही तेथे व्यवस्था करण्यात आली होती.

समुद्रकिनाऱ्यालगतचे कोळीवाडे, वस्त्यांबरोबरच टेकडय़ांवरील झोपडीत राहणाऱ्या नागरिकांनाही सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत होते. त्यानुसार वस्त्या आणि टेकडय़ांवरील काही नागरिकांनी स्वत:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.मुंबईत दिवसभरात उपनगरापेक्षा शहर भागात जास्त पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे ४६.७ मिमी तर सांताक्रूझ येथे २२.८ मिमी पावसाची नोंद झाली.

आरोग्य तपासणी करण्याचे आदेश

चक्रीवादळ ओसरल्यानंतर तात्पुरत्या निवाऱ्यांत व्यवस्था केलेल्या नागरिकांना घरी पाठविण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करावी, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

११७ झाडे उन्मळून पडली

सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात गेल्या २४ तासांमध्ये शहरात ३९, पूर्व उपनगरांत ४०, तर पश्चिम उपनगरांत ३८ अशी एकूण ११७ झाडे उन्मळून पडली. कोसळलेल्या झाडांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा मार्ग अडला होता. मात्र तात्काळ झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.

२१२ करोनाबाधितांना हलविले

वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर उभारलेल्या करोना आरोग्य केंद्रात दाखल २१२ रुग्णांना वरळी येथील एनएससीआय करोना जम्बो फॅसिलिटीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. चक्रीवादळात १२० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज असल्याने या रुग्णांना वरळी येथे स्थलांतरित करण्यात आले होते.

दुचाकी घसरून बालकाचा मृत्यू

मुंबई : पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय बालकाने जीव गमावला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कांदिवलीच्या साईधाम मंदिराजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अली अस्लम खान (११) आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी परतत होता. पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरल्याने अली रस्त्यावर फेकला गेला. तेवढय़ात मागून आलेल्या बेस्टच्या बसखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला.

जेवणाची रसद

चक्रीवादळामुळे बुधवारी सकाळीच दोन वेळच्या जेवणाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दुपारच्या जेवणासाठी भाताची खिचडी देण्याचे ठरले. मात्र रात्रीचे जेवण सकाळीच दिल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन रात्रीच्या जेवणासाठी ठेपला आणि चटणी देण्यात आली. तर काही ठिकाणी बर्गर व बिस्किटे देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 2:00 am

Web Title: 25000 residents shifted due to nisarga cyclone threat zws 70
Next Stories
1 चित्रीकरण ठप्प असले तरी चित्रनगरी सुरूच
2 माहीम कोळीवाडय़ातील रहिवाशांचा स्थलांतराला नकार
3 मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू
Just Now!
X