टाळेबंदीमुळे स्थलांतरित झाले असण्याची शक्यता

मुंबई : करोना आणि टाळेबंदीमुळे मोठय़ा प्रमाणावर मुंबईबाहेर स्थलांतर झाल्यामुळे दारिद्रयरेषेखालील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर लोटले गेले आहेत. पालिकेच्या शाळेतील तब्बल २५ टक्के म्हणजेच साधारण २५ ते ३० हजार मुलांचा कोणताही संपर्क नसल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

टाळेबंदीमुळे मार्च महिन्यात बंद पडलेल्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. खासगी शाळांप्रमाणे पालिकेच्या शाळांनीही ऑनलाइन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू केले. पण पालिकेच्या शाळांमधील तब्बल २५ टक्के विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत.  या मुलांचा शोध घेऊन त्यांना या शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

बऱ्याचदा घरात शिक्षणाची कोणतीही शिक्षणाची पाश्र्वभूमी नसलेली मुले, परराज्यातून मोलमजुरीसाठी आलेल्यांची मुले यात असतात. त्यांच्यापैकी अनेकांकडे मोबाइल नसतात, असले तरी स्मार्ट फोन नसतात. त्यातच टाळेबंदीमध्ये अनेक स्थलांतरित आपापल्या गावी गेल्यामुळे या पाल्यांशी शिक्षण विभागाचा कोणताही संपर्क गेल्या दोन महिन्यात होऊ शकलेला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सर्व मुख्याध्यापकांसाठी परिपत्रक काढलेले आहे. मार्च २०२० मध्ये हजेरीपटावर असेल्या सर्व विद्यार्थ्यांंची माहिती मागवली आहे. तसेच संपर्कात असलेल्या मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी व संपर्कात नसलेल्या मुलांना शोधण्यासाठी वर्गनिहाय पालक व शिक्षकांची समिती, बालकमित्र योजना, पालकमित्र योजना राबवण्याचे ठरवले आहे.

संपर्काचे प्रयत्न

पालिकेच्या शाळेत गेल्यावर्षी दोन लाख ६४ हजार मुले होती. त्यापैकी २५ टक्के मुले संपर्कात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘संपर्क असलेल्यांना मोबाइलवर गूगलद्वारे, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, मेसेंजर द्वारे आम्ही अभ्यासाचे व्हिडीओ पाठवतो. यात ६० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी संपर्कात आहेत,’ अशी माहिती शिक्षणाधिकारी पालकर यांनी दिली. तर जे विद्यार्थी संपर्कात आहेत परंतु, त्यांच्याकडे मोबाइल नाही अशा विद्यार्थ्यांंसाठी बालकमित्र योजना आहे. मोबाइल असलेल्या मुलांनी जवळच्या ज्या मुलाकडे मोबाइल नाही त्याला ऑनलाइन वर्गात सामावून घ्यावे, असेही प्रयत्न सुरू असल्याचे पालकर यांनी सांगितले.