आगामी पाच वर्षांत राज्यातील २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची घोषणा ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून चालू वर्षांत पाच हजार कोटी रुपये खर्चून १० हजार साखळी बंधारे बांधून पाच हजार गावे टंचाईमुक्त करण्यात येणार आहेत. याच गतीने पुढील काही काळात संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
राज्याच्या कोणत्या ना कोणत्या भागाला दर वर्षी टंचाई परिस्थिीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आगामी काळात योग्य नियोजन करून जलसंधारणाच्या माध्यमातून राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २६ जानेवारीपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली.
या अभियानासाठी गेल्या तीन वर्षांत सतत टंचाईचा सामना करावा लागलेल्या पाच हजार गावांची निवड करण्यात आली आहे.
चालू वर्षांत साखळी बंधारे, नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे, इत्यादी विविध प्रकारची कामे हाती घेऊन शेतीसाठी व पिण्यासाठी शाश्वत पाणी पुरवठा करणे हे जलयुक्त शिवार अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
या वर्षांत १० हजार साखळी बंधारे बांधून पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची योजना आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाच ते सहा हजार कोटी रुपये मिळतील.
राज्य सरकारने विशेष बाब म्हणून एक हजार कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.
 शिवाय जिल्हा वार्षिक योजनेतील १० टक्के निधी या कामासाठी वळविला जाणार आहे. या योजनेसाठी निधीचा कमतरता भासणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.