मुंबईतील ४७ रुग्णांपैकी पाच जणांपासून संसर्गाची भीती

शैलजा तिवले, मुंबई</strong>

मुंबई महानगरपालिकेने २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात राबविलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये नव्याने आढळलेल्या कुष्ठरुग्णांची संख्या ४७ वर पोहचली आहे. यातील पाच रुग्ण हे बहुजिवाणू (पॉसिबॅसेलरी) वर्गातील असून यांपासून संसर्ग पसरण्याचा धोका असल्याचे या तपासणीमधून निदर्शनास आले आहे.

राज्यभरात याच काळात राबविलेल्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये अडीच लाख संशयित रुग्ण आढळले असून तब्बल सुमारे चार हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये शहरातील सुमारे १० लाख कुटुंबांपैकी ९१ टक्के म्हणजे सुमारे नऊ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील सुमारे ४७ लाख लोकसंख्येपैकी सुमारे २७ लाख व्यक्तींची तपासणी केली गेली. २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या काळात केलेल्या या तपासणीमध्ये सुमारे १७ हजार कुष्ठरोग संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना पुढील तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले. शोधमोहिमेमध्ये एक स्वयंसेवक आणि एक विद्यार्थी असे २७०० चमू सहभागी झाले होते. प्रत्येक चमूने दरदिवशी २५ घरांचे सर्वेक्षण केले आहे.

१४ ऑक्टोबपर्यंत सुमारे १७ हजार संशयित रुग्णांपैकी केवळ ४४ टक्के रुग्ण आरोग्य केंद्रावर तपासणीसाठी पोहोचले होते. यात नव्याने आढळलेल्या कुष्ठरुग्णांची संख्या २८ होती. उर्वरित ५६ टक्के संशयित रुग्ण आरोग्य केंद्रावर आलेच नसल्याने पालिकेच्या डॉक्टरांनी गेल्या दहा-बारा दिवसांपासून त्यांच्या घरोघरी भेट देऊन तपासणी सुरू केली आहे. या तपासणीमध्ये नव्याने १९ कुष्ठरुग्ण आढळले आहेत. तेव्हा आधीचे २८ आणि हे १९ असे एकूण ४७ कुष्ठरुग्ण शहरामध्ये नव्याने आढळले आहेत.

२५ टक्के संशयित रुग्णांची तपासणी ३० ऑक्टोबपर्यंत पूर्ण होईल. तेव्हा ही संख्या वाढण्याची देखील शक्यता आहे,असे कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. राजू जोटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नव्याने आढळेलल्या रुग्णांना या आजाराविषयी माहितीदेखील नसल्याचे लक्षात आले. शरीरावर आलेले डाग दुखत नाहीत, त्याची काही इजा नाही, त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले होते. यातील काही व्यक्तींनी भीतीनेदेखील तपासणी केली नव्हती. या मोहिमेमुळे सुमारे २८ लाख व्यक्तींची तपासणी केली गेली असून त्यांच्यापर्यंत या आजाराबाबत योग्य माहिती पोहोचू शकली. तेव्हा या आजाराबाबत नक्कीच जनजागृती येईल, असा विश्वास पुढे डॉ. जोटकर यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील रुग्ण.. वांद्रे भागामध्ये

सर्वाधिक संशयित रुग्ण (१,२२८) आढळले आहेत. त्याखालोखाल चेंबूर (१३८६), परेल (७९७) संशयित रुग्ण आढळले.

चार हजार नवे रुग्ण..

राज्यभरामध्ये अडीच लाख संशयित रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या दीड लाख रुग्णांच्या तपासणीमध्ये सुमारे चार हजार नवे कुष्ठरोगाचे रुग्ण असल्याचे निदान झाले. तर उर्वरित एक लाख संशयित रुग्णांमधून कुष्ठरुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कुष्ठरुग्ण शोध मोहीम

* ९१ टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण

* सुमारे १७ हजार संशयित रुग्ण

* ७५ टक्के संशयित रुग्णांमधून ४७ नवे कुष्ठरोगाचे रुग्ण

* उर्वरित २५ टक्के संशयित रुग्णांमधून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

भीतीचे कारण..

मुंबईत १७ हजार संशयितांपैकी ७५ टक्के रुग्णांची डॉक्टरांमार्फत तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीमध्ये एकूण ४७ कुष्ठरुग्ण नव्याने आढळलेत. यापैकी यातील २५ रुग्ण हे बहुजिवाणू (मल्टिबॅसिलरी) आणि २२ रुग्ण अल्पजिवाणू (पॉसिबॅसेलरी) प्रवर्गातील आहेत. बहुपेशीय प्रवर्गातील पाच रुग्णांपासून दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका असल्याचे दिसून आले आहे. या पाचही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मुंबईत एप्रिल ते सप्टेंबर २०१८ काळात राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये १९५ नवे रुग्ण आढळले होते. दर दहा हजार लोकसंख्येमागे शहरातील कुष्ठरोगाचे प्रमाण ०.२२ टक्के आहे.

२००६ साली सरकारने कुष्ठरोगाचे निर्मूलन झाल्याचे जाहीर करून कागदावर हा आजार संपविला. त्यानंतर कुष्ठरुग्णांच्या नोंदीच ठेवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे समाजात असलेल्या कुष्ठरुग्णांकडून हा आजार फोफावत गेला. कुष्ठरोगासाठी स्वतंत्र विभाग आरोग्य विभागामध्ये कार्यरत होता. त्यामध्ये या आजाराचे निदान करणाऱ्याचे कौशल्य असणारे डॉक्टर उपलब्ध होते. परंतु कालांतराने हा विभाग इतर आरोग्य विभागामध्ये एकत्रित केला गेला. त्यामुळे या विभागाच्या कामावर मर्यादा आल्या. आजच्या घडीला कुष्ठरुग्णांचे निदान करणारे तज्ज्ञ आरोग्य केंद्रावर उपलब्ध नाहीत. औषधोपचारानंतर आजार बरा झाला का याची पडताळणी करण्यासाठी वापरात असलेली ‘स्लीट स्कीन’ तपासणीही बंद केली आहे. त्यामुळे अनेकदा औषधोपचार घेऊनही संसर्ग होत असल्याचे आढळून येते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल आणि सावली या तालुक्यामध्ये कुष्ठरोगाचे निदान केले जाते असले तरी नव्याने आढळलेल्या रुग्णांचे प्रमाणही नोंद घेण्याइतपत आहे. त्यामुळे या आजार संसर्गाव्यतिरिक्त पर्यावरण किंवा अन्य मार्गाने पसरत आहे का यावर संशोधन होणेही आवश्यक आहे. कुष्ठरोगामुळे येणाऱ्या अंपगत्वाचे प्रमाण हे आता ४ टक्क्यांपासून ते २४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या आजाराच्या रुग्णांना आधार देणाऱ्या संस्थांचे अनुदान सरकारने बंद केले आहे. अजूनही या आजाराबाबतचा समाजातील स्टिग्मा कायम आहे. त्यामुळे या आजाराच्या निदानापासून ते रुग्णांना आधार देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.

– डॉ. शीतल आमटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महारोगी सेवा समिती, आनंदवन