म्हाडाने पूर्वीच्या शिरस्त्याप्रमाणे सामान्यांसाठी मे महिन्यात सोडत जारी करण्याचा प्रघात कायम ठेवला असला तरी यावेळी विक्रीसाठी असलेल्या १,२५९ घरांपैकी फक्त २५१ घरेच तयार असून याच घरांचा प्रत्यक्षात ताबा मिळणार आहे. उर्वरित घरांसाठी तब्बल वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या सोडतीत बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली परिसरातील म्हाडाच्या घराची किंमत खासगी बिल्डरपेक्षाही अधिक असल्याचे आढळून आले आहे.
२०१० आणि २०११ च्या सोडतीतील अनेक भाग्यवान विजेत्यांना घरे तयार असली तरी भोगवटा प्रमाणपत्र नसल्याने अद्याप ताबा मिळालेला नाही. या सर्वाचे कर्जाचे हप्तेही सुरू झाले आहेत. आता दीड-दोन वर्षे होत आली तरी कुणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असे या विजेत्यांचे म्हणणे आहे. अशातच केवळ २५१ घरे विक्रीसाठी तयार असतानाही म्हाडाने घाईगर्दीने सोडत जाहीर केल्याचे दिसून येत आहे. म्हाडाच्या घरांचे दरही अव्वाच्या सवा वाढल्याचे दिसून येत आहे. खासगी बिल्डरांच्या तुलनेत हे दर कमी असल्याचा दावा म्हाडा प्रशासनाने केला असला तरी शिंपोलीतील घर मात्र कमालीचे महाग आहे. पवई, तुंगा परिसरात  खासगी बिल्डरांच्या चौरस फुटाचा दर ११ ते १२ हजार चौरस फुट असतानाही म्हाडाने १५ हजारहून अधिक दर ठेवला आहे. या ठिकाणी ४९२ सदनिका बांधल्या जात आहेत. या ठिकाणी कितपत प्रतिसाद मिळेल, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. ही सर्व घरे उच्च उत्पन्न गटासाठी असले तरी ती छोटी आहेत, असे अनेक इच्छुकांचे म्हणणे आहे.
*  अर्ज करण्याची मुदत १ ते २१ मे २०१३
*  ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सोय
*  भरलेला अर्ज शंभर रुपये शुल्क व अनामत रकमेच्या डीडी वा पे ऑर्डरसह ‘अ‍ॅक्सिस बँके’त जमा करण्याची मुदत २२ मे
*  बँकेत अर्ज जमा करायची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन (शनिवारी दुपारी दीडपर्यंत)
*  अनामत रक्कम ऑनलाइन भरण्याची सुविधा ६ मेपासून
*  घरांची सोडत ३१ मे रोजी
*  तात्काळ ताबा मिळणारी घरे – २५१ (अत्यल्प गट – मागठाणे, बोरिवली – ६२; पवई – ३०, प्रतीक्षा नगर, सायन – २४; तुर्भे, मंडाले, मानखूर्द – ३७; गायकवाड नगर, मालवणी – ६९; मध्यम गट – गायकवाड नगर, मालवणी – १; उच्च गट – शैलेंद्र नगर, दहिसर – २८)
*   बांधून पूर्ण; मात्र भोगवटा प्रमाणपत्र नाही – ५७ (अल्प गट – मालवणी, मालाड – ४४ उर्वरित शिंपोली, विनोबा भावे नगर, कुर्ला, मध्यम गट -प्रतीक्षा नगर, सायन)
*   अपूर्ण इमारती – ९५१ (अल्प गट – चारकोप, कांदिवली – ४२; मध्यम गट – विनोबा भावे नगर, कुर्ला – १६; चारकोप, कांदिवली – ८४; तुंगा, पवई – २५५; उच्च गट – ४९२)