मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्री एकामागोमाग सरी सुरू झाल्या होत्या त्यानंतर आज सकाळपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत पावसाने जोर धरल्यावर सर्वात आधी परिणाम होतो तो लोकल सेवांवर अपेक्षेप्रमाणे तो झाला आहेच. सकाळपासून मुंबईतील वडाळा या उपनगरात २५३ मिमी इतका प्रचंड पाऊस झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उप आयुक्त सुधीर नाईक यांनी ट्विट करून दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसमधून घरी जाणाऱ्या लोकांचे हाल झाले आहेत. अनेकांनी ऑफिसमध्येच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला आणि उबेर या टॅक्सी सेवेनेही घरी जाणाऱ्यांचे हाल झाले आहेत. रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

२९ ऑगस्ट हा दिवस आज मुंबईकरांना २००५ मध्ये झालेल्या २६ जुलैच्या मुसळधार पावसाची आठवण करून देणारा ठरला आहे. मुंबईतील रेल्वे रूळांवर पाणी साठले आहे, तसेच अनेकांना ट्रेनमध्ये अडकून पडावे लागले आहे. अनेक मुंबईकरांनी रूळांवरून चालत जाऊन इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

मुंबईत झालेल्या पावसाची आकडेवारी

परिसर            मागील २४ तास

अंधेरी             २७० मिमी

बीकेसी            २०४ मिमी

वांद्रे पश्चिम    २४७ मिमी

भांडुप              २५१ मिमी

कफ परेड          १२३ मिमी

दहीसर              १९० मिमी

गोरेगाव             १९३ मिमी

घाटकोपर           २२१ मिमी

 

राज्यात मागील २४ तासात झालेल्या पावसाची आकडेवारी

शहर                पावसाचे प्रमाण

अकोला             ६६.२ मिमी

अमरावती         १५.६ मिमी

गोंदिया              ३३.८ मिमी

नागपूर              १७.४ मिमी

पुणे                    १८.८ मिमी

कोल्हापूर            ३४ मिमी