करोना विषाणू साथीच्या दुसऱ्या उद्रेकामुळे मुंबईसह राज्यात दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत असल्याने धास्ती कायम आहे.

या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग नसल्याचा अहवाल दाखवल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश न देण्याचा आदेश मुंबई पालिकेने दिला आहे. तर राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांचा भंग केल्यास नाट्यगृहे, सभागृहे आणि कारखाने महासाथ संपेपर्यंत बंद करण्यात येतील, असा इशारा शुक्रवारी देण्यात आला. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गुरुवारी या संख्येने उच्चांक गाठला, तर शुक्रवारी तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,६८१ रुग्ण आढळले, तर मुंबईत ३,०६२ जणांना आणि ठाणे जिल्ह््यात १,९४९ जणांना संसर्ग झाला. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेने मॉलमध्ये प्रवेशासाठी करोना चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. संसर्ग नसल्याचा अँटिजन (प्रतिजन) चाचणी अहवाल दाखवल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश न देण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचे अधिकृत आदेश काढण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मुंबईत टाळेबंदी शिथिल झाल्यापासून सर्वत्र नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढला आहे. परिणामी, पालिके ने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी करोना प्रतिबंधासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मॉल आणि मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून नियम-निर्बंध धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिके च्या विभाग कार्यालयांमार्फत चाचण्या के ल्या जाणार आहेत.परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचीही करोना प्रतिजन चाचणी करण्याचा पालिके चा विचार आहे. प्रवासी बाधित आढळल्यास पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वाढत्या करोना चिंतेमुळे सरकारने करोना नियंत्रण नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश जारी केले आणि अनेक निर्बंधांमध्ये अधिक स्पष्टता आणली. नियमभंग केल्यास कारखाने, दुकाने, हॉटेल्स, नाट्यगृहे, सभागृहे करोना महासाथ संपेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या नंदुरबार दौऱ्यात टाळेबंदी हा फक्त पर्याय आहे, त्यामुळे प्रत्येकाने करोना निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त केली.

राज्यात २५,६८१ बाधित

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आणि ७० जणांचा मृत्यू झाला. राज्यात गुरुवारी आतापर्यंतच्या उच्चांकी २५,८३३ रुग्णांची नोंद झाली होती, तर शुक्रवारी २५,६८१ नवे बाधित आढळले. गुरुवारपेक्षा शुक्रवारच्या रुग्णसंख्येत घट दिसत असली तरी ती लक्षणीय नाही.

मुंबईत ३०६२ नवे रुग्ण

मुंबईत शुक्रवारी नव्या ३,०६२ रुग्णांची नोंद झाली, तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १३ टक्क्यांंवर गेले आहे. ठाणे जिल्ह््यात शुक्रवारी १,९४९ करोनाबाधित आढळल,े तर आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीत ५९५, ठाणे शहर ५१८, नवी मुंबई ३४७, बदलापूर ७४, अंबरनाथ ७५, मिरा भाईंदर १२४, उल्हासनगर १०८, ठाणे ग्रामीण ७३ आणि भिवंडी ३५ रुग्ण आढळले.

देशात गेल्या २४ तासांत ३९,७२६ जणांना करोनाचा संसर्ग झाला. हा गेल्या ११० दिवसांमधील उच्चांक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

राज्य सरकारचे नवे निर्बंध

  • नाट्यगृहे, सभागृहांत धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा घेण्यास बंदी.
  • निर्बंधांचा भंग केल्यास नाट्यगृहे, सभागृहे आणि कारखाने साथ संपेपर्यंत बंद.- खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे बंधन.
  • चित्रपटगृहांबरोबरच आता नाट्यगृहे आणि सभागृहांमध्येही ५० टक्के प्रेक्षक क्षमतेचे बंधन
  • शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील उपस्थितीबाबत स्थानिक परिस्थितीनुसार विभागप्रमुख निर्णय घेतील.
  • कारखाने पूर्ण क्षमतेने पाळ्यांमध्ये चालवण्यास मुभा, मात्र नियमोल्लंघन केल्यास साथ संपेपर्यंत बंद करण्याचा इशारा.

केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक : डॉ. शशांक जोशी

मुंबई : करोनाची दुसरी लाट आली असतानाही केंद्राकडून महाराष्ट्राला ठोस मदत न देता सापत्न वागणूक दिली जात आहे. केंद्रीय पथके राज्यात पाहाणीसाठी येतात आणि केवळ उपदेशाचे डोस पाजून निघून जातात. पुरेशा प्रमाणात लसही पाठवली जात नाही, अशी खंत राज्य कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केली.