राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद झाली. चोवीस तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार १७४ जणांनी या आजारावर मात के ली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन- चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असून एका दिवसात सर्वाधिक बाधितांची उच्चांकी नोंद गुरुवारी झाली. सध्या राज्यात आठ लाख १३ हजार २११ व्यक्ती गृह अलगीकरणात असून ७०९७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.७९ टक्क्यांवर गेले आहे.

१०० दिवसांतील सर्वाधिक…

देशात गेल्या एक दिवसात आणखी ३५ हजार ८७१ जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या १०० दिवसांमधील उच्चांक आहे. त्यामुळे बाधितांची संख्या एक कोटी, १४ लाख ७४ हजार ६०५ वर पोहोचली आहे, असे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

परिस्थिती…

गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये सर्वाधिक ४५२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्याखालोखाल मुंबईत २८७७, पुण्यात २७९१, औरंगाबादला एक हजार २७४, पिंपरी-चिंचवड १२७२ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे.

तुलना… गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी राज्यात करोनाबाधितांचा आकडा २४ हजार ८९६ पर्यंत गेला होता. गुरुवारी २५ हजार ८३३ नव्या रुग्णांचे निदान झाले.

नवा उच्चांक : राज्यात गेल्या वर्षी ११ सप्टेंबरला करोनाचे २४ हजार ८८६ रुग्ण आढळले होते. करोनाकाळातील ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, गुरुवारी २५ हजार ८३३ नव्या रुग्णांचे निदान झाले आणि रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदला गेला.

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता

मुंबई : राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी दिली. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, तीन-चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासानाला दिले. राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांशी संवाद साधत लसीकरणाचा आढावा घेतला.