बेदरकार गाडय़ांचे क्रमांक टिपण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे

सर्वात व्यग्र आणि अपघातांमुळे सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या नव्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बेदरकार चालकांच्या वेगवेडाला वेसण घालण्यात येणार आहे. महामार्ग पोलिसांनी या मार्गावरील तीन टोल नाक्यांवर ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन’ असलेले २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. बेछूट वाहनचालकांना आळा बसवताना अपघात कमी व्हावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी एक्स्प्रेस वेवर अदृश्य पोलीस पथकही नेमले आहेत. या पथकाकडून निष्काळजीपणे धावणाऱ्या वाहनाचा क्रमांक टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना पाठविला जाईल. त्यानुसार तात्काळ टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून या कॅमेऱ्यांसाठी असलेल्या स्वतंत्र यंत्रणेत वाहन क्रमांक नमूद केला जाणार आहे. वाहन टोल नाक्यावर येताच वाहनाचा नंबर प्लेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपला जाईल आणि अलर्ट देणारा अलार्म वाजेल. त्यामुळे अशा वाहनचालकांवर जलद गतीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठय़ा प्रमाणात काळजी न घेता वाहन चालविण्याचे प्रकार होतात. तसेच एकाच मार्गिकेतून न जाता अन्य मार्गिकेतही वाहन घुसविण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अपघात होतात. त्यांना आळा बसावा आणि वाहनचालकांवर कारवाई व्हावी म्हणून महामार्ग पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी अदृश्य पोलीस पथक नेमण्यात आले. एखादा चालक वाहतूक नियम धुडकावून कशाही प्रकारे वाहन चालवत असेल किंवा आपली मार्गिका सोडून अन्य मार्गिकेत प्रवेश करत असेल तर त्याच वेळी कार्यरत असणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांकडून मोबाइलवर वाहन क्रमांकांची माहिती घेतली जाते. त्वरीत ही माहिती एक्स्प्रेस वे वरील टोल नाक्यावर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येते. माहिती मिळताच टोल नाक्यांवरील कर्मचारी आपल्याकडील नोंदवहीत ती नोंद करतो. टोल नाक्यावर अनेक वाहने येत असल्याने त्यातून दोषी असलेले वाहन शोधून काढून कर्मचारी कारवाई करतात.अनेकदा दोषी असलेले वाहन नजरचुकीमुळे सापडतही नाही. त्यामुळे कारवाई करताना बराच गोंधळ उडतो आणि दोषी वाहनचालकही सहजपणे सुटून जातो.

खालापूर टोल नाक्यावर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकतेच संबंधित एका कंपनीकडून सादरीकरण करण्यात आले. आणखी काही प्रक्रिया बाकी असून त्यानंतरच कॅमेरे बसविले जातील. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रथमच असे कॅमेरे बसविण्याचा विचार केला जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील तीन टोल नाक्यांवर वाहन क्रमांक कॅमेऱ्यात कैद करणारे २६ सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया अद्याप सुरूआहे. यामुळे बेदरकारपणे आणि मार्गिकेचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना चाप बसेल. तसेच आमच्या अदृश्य पोलीस पथकावरील कामाचा ताणही कमी होईल.   – विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस

होणार काय?

नियम मोडणारे वाहनचालक सुटू नयेत आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन असलेले २६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांकडून घेण्यात आला आहे. एक्स्प्रेस वे वरील खालापूर टोल नाक्यावर १६, उरसे टोल नाक्यावर आठ आणि कुसगाव टोल नाक्यांवर दोन कॅमेरे बसविले जातील. मार्गावर कार्यरत असणाऱ्या अदृश्य पोलीस पथकाकडून दोषी वाहनाचा क्रमांक टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला पाठविल्यानंतर तो क्रमांक कॅमेऱ्यासाठी असलेल्या स्वतंत्र यंत्रणेत नमूद (फिड) केला जाईल. दोषी वाहन टोल नाक्यावर येताच कॅमेऱ्यात वाहन क्रमांक टिपला जाणार आहे आणि त्वरित अलर्ट देणारा अलार्म वाजेल. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकावर कारवाई केली जाईल.