दुर्घटनेत १२ जणांचा बळी, १४ जण जखमी

मुंबई : मुंबईसह सर्वत्र ३१ डिसेंबरला नव्या वर्षांच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना सरत्या वर्षांतील शेवटचा दिवस रेल्वे प्रवाशांकरिता अपघातवार ठरला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ३१ डिसेंबरच्या दिवशी २६ विविध प्रवासी अपघातांची नोंद झाहे. त्याआधी ७ व १५ डिसेंबर रोजी प्रत्येकी २४ अपघातांची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली होती. परंतु, ३१ डिसेंबरने ही आकडेवारी मागे टाकली आहे. या अपघातांत १२ जणांना जीव गमवावा लागला असून १४ जण जखमी झाले आहेत. सोमवारी झालेल्या अपघातात बोरिवली पोलीस स्टेशन हद्दीत सर्वाधिक आठ अपघात झाले आहेत.

रूळ ओलांडताना लोकलची किंवा मेल-एक्सप्रेस गाडय़ांची ठोकर लागणे, लोकल गाडय़ांमधून पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागण्यासह अन्य प्रकारे होणाऱ्या अपघातांची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे होत असते. अपघातांना आळा बसवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. यात जनजागृती करण्याचे कामही केले जाते. याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना अपघातांना तोंड द्यावे लागते. डिसेंबर महिना हा प्रवाशांसाठी घातवारच ठरला आहे. या महिन्यात १५० पेक्षा जास्त प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत, तर २०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले.

अपघात झालेले दिवस

७ डिसेंबर- ८ मृत्यू, १६ जखमी

१५ डिसेंबर- १२ मृत्यू, १२ जखमी

३१ डिसेंबर -१२ मृत्यू, १४ जखमी

गाडय़ांना गर्दी

३१ डिसेंबरच्या दिवशी उपनगरी गाडय़ांना गर्दीचे चित्र होते. या दिवशी बाहेर फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. याच दिवशी एकूण २६ प्रवाशांचे अपघात झाले. यामध्ये १२ जणांचा मृत्यू आणि १४ प्रवासी जखमी झाले आहेत. बोरिवली, त्यापाठोपाठ मुंबई सेन्ट्रल, कुर्ला, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जास्त अपघातांची नोंद आहे. सोमवारी आठ प्रवाशांना अपघात झाला असून पाच जणांचा मृत्यू व ३ जण जखमी झाले.