३१ जानेवारीपासून आणखी २६ लोकल फेऱ्या

नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या अशा हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेला मध्य रेल्वेकडून नवीन लोकल फेऱ्यांचा दिलासा देण्यात येणार आहे. येत्या ३१ जानेवारीपासून २६ नवीन फेऱ्या सुरू केल्या जात असून यामध्ये १० फेऱ्या हार्बर आणि १६ फेऱ्या ठाणे ते वाशी आणि पनवेल या ट्रान्स हार्बरवर चालविण्यात येणार आहे. यात हार्बरवरून लोकल चालविताना वडाळा स्थानकापासून डाऊन मार्गावर होणारी गर्दी पाहता सीएसएमटीऐवजी वडाळा स्थानकापासूनच नवीन लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वेकडून ऑक्टोबर २०१७ मध्ये हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर २८ नवीन लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. यापाठोपाठ रेल्वेने आणखी २६ लोकल फेऱ्यांचेही नियोजन करण्यास सुरुवात केली.  रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हार्बरवरील लोकल फेऱ्या सीएसएमटीऐवजी वडाळा स्थानकापासूनच चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी स्थानकापासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक नाही. तर वडाळा स्थानकापासून सर्वात जास्त प्रवासी प्रवास करत असल्यानेच वडाळा ते पनवेल ते वडाळा अप आणि डाऊन पाच तर वडाळा ते वाशी ते वडाळा पाच अशा १० लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ट्रान्स हार्बरवरही १६ फेऱ्या सुरू करताना पनवेल, वाशी बरोबरच नेरुळसाठीही लोकल फेऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. ठाणे ते पनवेल ते ठाणे सहा, ठाणे ते नेरूळ ते ठाणे सहा आणि ठाणे ते वाशी ते ठाणे चार लोकल फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. या फेऱ्या ३१ जानेवारीपासून सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा जरी प्रयत्न आहे.

अंधेरी ते गोरेगावपर्यंत हार्बरचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र काही तांत्रिक बाबी पूर्ण होणे बाकी असून त्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. अंधेरी ते गोरेगावपर्यंत ५२ लोकल फेऱ्यांचा विस्तार होणार आहे.

* हार्बरवर सध्या ६०४ लोकल फेऱ्या असून दहा फेऱ्या सुरू झाल्यास एकूण फेऱ्यांची संख्या ६१४ होईल.
* तर ट्रान्स हार्बरवर २१६ लोकल फेऱ्या चालवण्यात येत असून १६ फेऱ्यांचा समावेश झाल्यास या मार्गावरील फेऱ्यांची एकूण संख्या २६२ एवढी होईल.