गर्लफ्रेंडवर लाखो रुपये उधळण्यासाठी तिच्या बॉयफ्रेंडने पाच जणांना २८ लाखांना फसवल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. सुरज रमेश कलाव, अलियास लतिकेश असे या तरुणाचे नाव आहे. लतिकेशने गर्लफ्रेंडवर पैसे उधळण्यासाठी दिवा आणि ठाणे येथे राहण्याऱ्या पाचजणांना २८ लाखांना चुना लावला आहे. सरकारी नोकरी लावून देतो असे सांगत त्याने या सगळ्यांकडून पैसे उकळले होते.

लतिकेशला दारुचे व्यसन आहे, तो सर्रास बारमध्ये जात असे तिथल्या मुलींवर तो पैसे उधळत असे. या मुलींपैकी एक त्याची गर्लफ्रेंड होती. तिच्यावर त्याने लाखो रुपये उडवले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. सचिन घडवे आणि त्याच्या चार मित्रांनी लतिकेश विरोधात तक्रार दाखल केली ज्यानंतर लतिकेशला पोलिसांनी अटक केली. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

करी रोड भागात राहणाऱ्या लतिकेशने सचिन घडवे आणि त्याच्या चार मित्रांना मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो असे सांगत त्यांच्याकडून अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल असे सांगत पैसे उकळले. ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत या पाचही जणांनी लतिकेशला २८ लाख १२ हजार रुपये दिले. मात्र लतिकेश फक्त आश्वासने देत राहिला कोणालाही नोकरी मिळालीच नाही.

एवढेच नाही तर पैसे घेतल्यानंतर लतिकेशने घडवे आणि त्याच्या मित्रांचे फोन घेणेही बंद केले. मागील महिन्यात या सगळ्यांनी लतिकेश विरोधात तक्रार दाखल केली. महिनाभर लतिकेशचा शोध घेतल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आपण सगळे पैसे गर्लफ्रेंडवर उधळल्याची कबुली लतिकेशने दिली. लतिकेशवर याआधीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दादर आणि काळाचौकी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आता पोलीस लतिकेशने नेमका कुणाला आणि किती रुपयांना चुना लावला आहे त्याचा शोध घेत आहेत.