मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलिसांना बॉम्बस्फोटके शोधून देण्यास महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या सिझर या श्वानाचा गुरुवारी विरारच्या फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला. वयोमान आणि संधिवाताच्या आजाराने त्याचा मृत्यू झाला. मुंबई हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांना मदत करणारे सर्व म्हणजे चारही श्वान मरण पावले आहेत.

मुंबई पोलीस दलातील टायगर, मॅक्स सुलतान आणि सिझर या चार श्वानांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत स्फोटके शोधून देण्यास मदत केली होती. निवृत्तीनंतर या चारही श्वानांना देखभालीसाठी विरार येथील फिझा शाह यांच्या फार्म हाऊसवर ठेवण्यात आले होते. मॅक्स आणि सुलतानचा पूर्वी आणि टायगरचा नुकताच मृत्यू झाला होता. तीनही सवंगडी गेल्याने सिझर तणावात होता. त्याचे वय १३ वर्षे होते. त्यात तो संधिवाताने आजारी होता. त्याचे वजन वाढू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते. महिन्याभरापासून त्याची प्रकृती खालावली होती.

संबधित बातमी : टायगरच्या जाण्याने शोकाकुल सिझर तणावाखाली