मुंबई : मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी सोमवारी अवघ्या २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णसंख्या घसरल्याचे निदर्शनास आले. सोमवारी दोन हजार ६६२ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली असून ७९ रुग्णांचा मृत्यू झाला.

मोठय़ा प्रमाणावर चाचण्या करुन करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून चाचण्याचे प्रमाण घसरू लागले आहे. सोमवारी २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ५५ लाख १३ हजार ७८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी २,६६२ नवे रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ५८ हजार ८६६ वर पोहोचली आहे.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे ५२ पुरुष आणि २६ महिलांचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १३ हजार ४०८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे पाच हजार ७४६ रुग्ण सोमवारी करोनामुक्त झाले. नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक बाधित सोमवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत पाच लाख ८९ हजार ६१९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८९ टक्क्य़ांवर पोहोचले असून त्यामुळे उपचाराधिन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली  आहे.

आजघडीला ५४ हजार १४३ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत

आहेत.  करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील २० हजार ४७७ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यापैकी ८८८ संशयीत रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

उर्वरित संशयित रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. बाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधित करण्यात येणारी ठिकाणे आणि टाळेबंद करण्यात येणाऱ्या इमारतींची संख्याही कमी झाली आहे.