शैलजा तिवले

राज्यात प्रथमच राबविलेल्या असंसर्गजन्य आजारांच्या सर्वेक्षणामध्ये जवळपास २७ लाख जणांना उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजाराची लक्षणे दिसून आली आहेत, तर जवळपास ७१ हजार कर्करोगाचे संशयित रुग्ण आढळले आहेत.

या सर्वेक्षणामध्ये ७ हजार क्षयरोगाचे आणि ४ हजार ७०० कुष्ठरोगाचे नवीन रुग्ण निदर्शनास आले आहेत. राज्यातील ग्रामीण (१०० टक्के)आणि शहरी (३० टक्के) भागातील सुमारे ७ कोटी नागरिकांचे सर्वेक्षण सप्टेंबर महिन्यात करण्यात आले होते.

कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये या आजारांचे वेळेत निदान करून उपचार सुरू करण्यासाठी रुग्णशोध मोहीम राबविली जाते. यावर्षीही ही मोहीम सप्टेंबर महिन्यात राबविली असून यामध्ये राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ८ कोटी ५६ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार होती. प्रत्यक्षात यातील ८५ टक्के नागरिकांचीच तपासणी होऊ शकलेली आहे. कुष्ठरोग, क्षयरोग यासोबतच यावर्षी प्रथमच ३० वर्षांवरील एकूण २ लाख ६५ हजार व्यक्तींचे वजन आणि पोटाचा घेर, दारू, सिगारेट इत्यादीचे व्यसन, कुटुंबात असंसर्गजन्य आजारांची आनुवंशिकता याची पाहणी केली गेली. यावरून उच्च रक्तदाब, मधुमेह यांची लक्षणे आढळलेल्या २७ लाख २८ हजार व्यक्तींना पुढील तपासणीसाठी पाठविले आहे. या सर्वेक्षणात स्तनाचा, गर्भाशयाचा आणि मुखाच्या कर्करोगाचीही तपासणी केली गेली. यात ७१ हजार २०७ जणांमध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे आढळली आहेत.

जनजागृतीचा अभाव

कुष्ठरोग आणि क्षयरोग या आजारांबाबतची समाजातील अढी अजूनही कायम आहे. तसेच कुष्ठरोगाबाबत पुरेशी जनजागृती नाही. यामधून आढळलेल्या संशयित रुग्णांची अजूनही तपासणी सुरू आहे. त्यामुळे कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या नव्या रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. या माध्यमातून जनतेमध्ये या आजारांबाबतही जनजागृती झाली हे देखील महत्त्वाचे असल्याचे डॉ. जोगेवार यांनी व्यक्त केले.

कुष्ठरोगाच्या ४ हजार ७०० नव्या रुग्णांचे निदान

कुष्ठरोगाचे जवळपास २ लाख संशयित रुग्ण आढळले असून यातून दीड लाखांहून अधिक रुग्णांची तपासणी पूर्ण झालेली आहे. यामधून ४ हजार ७०० कुष्ठरोगाचे नवीन रुग्णांचे निदान केले आहे. या रुग्णांमध्ये सुमारे

४० टक्के रुग्ण हे बहुजिवाणू (मल्टीबॅसिलरी) वर्गातील असून यांच्यापासून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. या सर्वेक्षणामध्ये आशा सेविकांसह ७० हजार ७६८ गट कार्यरत होते.

क्षयरोगाचे ७ हजार नवे रुग्ण : क्षयरोगाचे १ लाख ४७ हजार संशयित रुग्ण आढळले असून तपासण्यांमध्ये ७ हजार नवीन क्षयरोगाचे रुग्ण दिसून आले आहेत. दरवर्षी सर्वसाधारणपणे क्षयरोगाची बाधा होण्याची संभावना असलेल्या सुमारे एक कोटी नागरिकांचे सर्वेक्षण केले जाते. परंतु यावर्षी प्रथमच ग्रामीण भागांमध्ये १०० टक्के आणि शहरी भागातील ३० टक्के लोकांचे क्षयरोगाचे सर्वेक्षण केले गेले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू केले आहेत, असे राज्य क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.