स्वाइन फ्लूची साथ मुंबई महानगर प्रदेशात अधिक तीव्र असून जुलैपासून आतापर्यंत राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी ७४ टक्के मृत्यू याच परिसरात झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जुलैमध्ये राज्यात १४ मृत्यू झाले असून ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत १३ मृत्यूंची नोंद झाली आहेत. यातील बहुतांशी मृत्यू मुंबई परिसरातील आहेत.
फेब्रुवारीपासून स्वाइन फ्लूची साथ राज्याच्या ग्रामीण भागात सुरू झाली व वेगाने पसरली. या साथीमध्ये आतापर्यंत ५७१ मृत्यूंची अधिकृत नोंद झाली आहे. यातील १०८ मृत्यू पुणे शहर व जिल्हा, ७० मृत्यू नागरपूर येथे तर ४७ मृत्यू नाशिक येथे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ३१ मृत्यूंची नोंद आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत नाशिक, नागपूर, पुणे येथे असलेली स्वाइन फ्लूची साथ आता मुंबईत तीव्र होताना दिसत आहे. राज्यात जुलैमध्ये १४ तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत १३ मृत्यू झाले आहेत. यापैकी २० मृत्यू मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरात झाले आहेत. त्यातही १२ मृत्यू हे केवळ मुंबईतील आहेत.
स्वाइन फ्लूमुळे कमी प्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक गुंतागुंत निर्माण होते असे दिसून आले आहे. राज्यातील एकूण मृत्यूंपैकी साधारण दहा टक्के मृत्यू हे गर्भवती स्त्रियांचे आहेत, असे आरोग्य खात्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. मात्र मुंबईतील गेल्या दोन महिन्यांत झालेल्या मृत्यूंपैकी काहींमध्ये यापैकी कोणतेही कारण दिसलेले नाही.