टाळेबंदीमुळे घटलेले उत्पन्न, कौटुंबिक जबाबदारी, अवाजवी शुल्काचे अडथळे

मुंबई : करोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने बेरोजगारी, उपासमारी यांना निमंत्रण दिले असतानाच या टाळेबंदीचे दूरगामी परिणामही दिसून येऊ लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या २७ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे शक्य नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. टाळेबंदीमुळे रोजगारावर आलेल्या मर्यादा, घटलेले उत्पन्न, कौटुंबिक जबाबदारी आणि अवाजवी शिक्षण शुल्क या कारणांमुळे शिक्षणावर खर्च करणे कठीण असल्याचे ५२ टक्के विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा अपरिहार्य मार्ग महाविद्यालयांनी स्वीकारला असला तरी त्यासाठी आवश्यक साधनांची कमतरता असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक बी. एन. जगताप आणि करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांनी केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाला राज्यातील ३८ हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन, ऑनलाइन शिक्षण अशा विविध मुद्दय़ांची पाहणी या अभ्यासात करण्यात आली.

टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांनाही सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे शिक्षण सुरू ठेवण्याबाबत विद्यार्थी अनिश्चित आहेत. यंदा आर्थिक नियोजन बिघडण्याची चिंता ८२ टक्के  विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यातील २७ टक्के विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यात मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आहे. शिक्षणाचा खर्च उचलणे कठीण असल्याचे मत ५२ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, असे मत व्यक्त करणाऱ्यांमध्ये ग्रामीण-शहरी असा भेद नाही. शहरी भागातून सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के विद्यार्थ्यांचे हेच मत आहे तर, ग्रामीण भागांतील ६१ टक्के विद्यार्थ्यांना हा अडचणींचा डोंगर समोर दिसत आहे.

शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदारी अशा दुहेरी पातळीवर लढाई देण्याची तयारी अनेक विद्यार्थ्यांनी दर्शवली आहे. सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्या ५१ टक्के विद्यार्थ्यांनी अर्धवेळ नोकरी करून कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर १८ टक्के विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’सारख्या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक खर्चाचा भार उचलावा असे वाटत आहे.

 

ऑनलाइन शिक्षण अडचणींचे : सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ९१ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहेत. त्यातील बहुतांश जणांकडे इंटरनेट जोडणीही आहे. मात्र, ६८ टक्के विद्यार्थ्यांकडे संगणक नाही. इंटरनेट जोडणीमध्येही जलद ब्रॉडबँड इंटरनेट असलेल्यांची संख्या जेमतेम आठ टक्के आहे. या कारणांमुळे ऑनलाइन शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांचे प्रतिकूल मत आहे. ऑनलाइन प्रकल्पांना ४६ टक्के विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. आभासी प्रयोगशाळांचा पर्याय अनेक शिक्षणसंस्थांनी अवलंबला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे प्राधान्य प्रत्यक्ष प्रयोगशाळेत जाऊन काम करण्याला अधिक असल्याचे दिसते.