गोरेगाव येथून बेपत्ता असेलल्या २७ वर्षीय तरुणीचा मृतदेह गुरुवारी सकाळी बोरीवलीच्या संजय गांधी रुग्णालयात आढळला. गळा चिरून तिची हत्या करण्यात आली होती.
सरला अहिरे (२७) ही अविवाहित तरुणी गोरेगावच्या तीन डोंगरी परिसरातील तानाजी नगर मध्ये आई आणि बहिणीसह राहात होती. येथील एका नकली दानिने बनविणाऱ्या कंपनीत ती कामाला होती. बुधवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे तिने कामावर जाण्यासाठी आपले घर सोडले.
सरला गेल्या महिन्याभरापासून आजारपणामुळे घरी होती. आठवडय़ाभरापूर्वीच ती पुन्हा कामावर रूजू झाली होती. मी कामावर आले असून जेवणही केले, असे तिने आईला सांगितले होते. कामावरून घरी जाण्यासाठी तिची आई सरलाच्या कार्यालयात पोहोचली ती कामावर आलीच नसल्याचे कळले. तिचा दूरध्वनीही बंद होता. अखेर गोरेगाव पोलीस ठाण्यात सरला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील त्रिमुर्ती गाव परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तेथील स्थानिक मुलांना आढळला. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्वरीत या प्रकरणी तपास सुरू केला आणि तिचे छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यात पाठवले होते. त्यावेळी तो मृतदेह बेपत्ता असलेल्या सरला अहिरेचा असल्याचे कळले. सरलाचे हात पाठीमागून बांधले होते आणि डोळ्यावर ओढणी बांधण्यात आली होता. गुंगीचे औषध देऊन नंतर तिची हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सरलाच्या अंगावरील दागिने तसेच असून डाव्या कानातील कर्णफुले आणि बॅग गायब झालेली आहे. तिच्यावर हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाला होता का त्याचाही तपास न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ञांमार्फत केला जाणार आहे.
‘आम्ही सर्व शक्यता पडताळून या प्रकरणाचा तपास करत आहोत,’ असे कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत वरळीकर यांनी सांगितले. संजय गांधी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील ‘सीसीटीव्ही’चे चित्रिकरणही तपासले जाणार आहेत. ही हत्या प्रेमसंबंधातून हत्या झाली का? याची चौकशी करण्यासाठी सरलाच्या एका मित्रालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 2:36 am