निश्चलनीकरणानंतर  काळा पैसा पांढरा करण्यासाठी काळा पैसाधारकांनी अनेक क्लृप्त्या लढवल्याचे स्पष्ट झाले आहे. कधी तिऱ्हाईताच्या खात्यात पैसे जमा कर तर कधी जनधन खात्यांचा आधार घे, असे प्रकार उघडकीस आले. आता सिटिझन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यांवर प्राप्तिकर खात्याची करडी नजर गेली असून तब्बल साडेचार हजार खात्यांमध्ये ८ नोव्हेंबरनंतर झालेल्या व्यवहारांची चौकशी प्राप्तिकर खात्याकडून केली जाणार आहे. महाराष्ट्रासह गोवा आणि दमण येथे या बँकेच्या शाखा आहेत.

८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सिटिझन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेत दीड महिन्यांच्या कालावधीत तब्बल २७५ कोटी रुपये जमा झाले. शिवाय तीन हजार नवीन खाती उघडण्यात आली तर एरवी बंद अवस्थेत असलेली दीड हजार खाती पुन्हा उघडण्यात आली. त्यामुळे या सर्व खात्यांवरील व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच ६० खात्यांमध्ये अनेक व्यवहार झाल्याचेही प्राप्तिकर खात्याच्या निदर्शनास आले आहे. प्राप्तिकर खात्याने गेल्या आठवडय़ात बँकेच्या सर्व व्यवहारांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.