समीर कर्णुक

केईएम रुग्णालयातील सेवानिवृत्त परिचारिकेला पालिकेची नोटीस

पतीच्या आजारपणामुळे चार वर्षे पालिकेचे घर रिकामे करू न शकलेल्या सेवानिवृत्त परिचारिकेला पालिकेने तब्बल २८ लाख रुपये घरभाडे भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. शिवाय सेवानिवृत्त झाल्यानंतर पालिकेने महिलेला एक रुपयाही दिलेला नाही. सध्याही या महिलेच्या पगारातून दरमहा अठराशे रुपये कापून उर्वरित रक्कम पेन्शन म्हणून दिली जात आहे. परिणामी निवृत्तीनंतरही या महिलेला खासगी नोकरी करून गुजराण करावी लागत आहे.

विनिता तोरसकर असे या सेवानिवृत्त महिलेचे नाव असून गेली ४० वर्षे त्या केईएम रुग्णालयात परिचारिका या पदावर काम करत होत्या. उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना पालिकेच्या वतीने अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील आले आहे. २०१०ला त्या केईएम रुग्णालयातून सेवानिवृत्त झाल्या. मात्र याच दरम्यान त्यांच्या पतीला कर्करोगाने ग्रासले होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ते राहत असलेल्या पालिका वसाहतीमधील घर रिकामे न करता, काही दिवस त्याच घरात राहण्याचा निर्णय घेतला. मात्र २०१४ला त्यांच्या पतीचे निधन झाले. याच दरम्यान त्यांना पालिकेकडून खोली देखील रिकामी करण्यास सांगण्यात आले. यासोबतच पालिकेने त्यांना ४ वर्षे अधिक राहिल्याने खोलीचे भाडे म्हणून २७ लाख ९१ हजार ९१० रुपये भरण्याची नोटीस देखील पाठवली.

सेवनिवृत्तीनंतर त्यांना पालिकेकडून २० ते २२ लाख रुपये मिळणे आवश्यक होते. मात्र पालिकेने त्यांचे केवळ ५ लाख ४४ हजार १७९ रुपये जमा असल्याचे दाखवत ही साडे पाच लाखांची रक्कम देखील घरभाडय़ामधून कापून घेतली आहे. याबाबत त्यांनी अनेकदा पालिका कार्यालयात जाऊन चौकशी केली. मात्र पालिका अधिकारी आज-उद्या करत मला चार वर्षे हेलपाटे घालायला लावत असल्याचा आरोप तोरसकर यांनी केला आहे.

सेवानिवृत्तीनंतर त्यांना पालिकेकडून १६ हजार आठशे रुपये इतकी पेन्शन देण्यात येत आहे. मात्र त्यामधून देखील पालिका अठराशे रुपये थकीत घरभाडे कापून घेत आहेत. सध्या तोरसकर त्यांच्या एका मुलासह माहीम येथे भाडय़ाच्या खोलीत राहत असून त्यांना या ठिकाणी १४ हजार रुपये घरभाडे भरावे लागत आहे. त्यामुळे केवळ १ हजार रुपयेच त्यांना घरखर्चासाठी शिल्लक राहतात. त्यामुळे वयाच्या सत्तरीत देखील त्यांना एका खासगी संस्थेमध्ये काम करून उदरनिर्वाह करावा लागत आहे.

मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन नांदगावकर यांनी तोरसकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून ते आयुक्तांना भेटून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याबाबत केईएमचे अधिष्ठाता अविनाश सुपे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, मला याबाबत काहीही माहिती नसून माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया दिली.

पालिकेच्या खोलीचे भाडे ६० हजार रुपये महिना

कामावर असताना विनिता तोरसकर यांच्या पगारातून दरमहा पालिका १६६ रुपये घरभाडे कापत होती. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर हेच भाडे ६० हजाराच्या हिशेबाने लावत तोरसकर यांना ही २८ लाखांची नोटीस पालिकेने पाठवली आहे. त्यामुळे त्या बंगल्यात राहत होत्या का असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे.