राज्यात करोनाच्या आणखी २८ रुग्णांची शुक्रवारी नोंद झाली. त्यात सांगलीतील १२ जणांचा समावेश असून, जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या २३ वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १५३ वर पोहोचली आहे.

सौदीहून सांगलीत आलेल्या कुटुंबाशी संपर्कात आलेल्या आणखी १२ जणांना करोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. नागपूरमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चार जणांनाही या विषाणूची लागण झाली आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी दोन, तर पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला.  हा राज्यातील पाचवा बळी आहे. एका करोना संशयित डॉक्टरचाही मृत्यू झाला. राज्यात शुक्रवारी २५० जण रुग्णालयांत दाखल झाले. राज्यात विलगीकरण कक्षांत आजपर्यंत ३४९३ जणांना दाखल करण्यात आले.