सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे झाडांचा विखुरलेला पालापाचोळा, रस्त्यावर विखुरलेला आणि समुद्रकिनाऱ्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी बकाल अवस्था आली होती. झोपडपट्टय़ांमध्ये तर कचऱ्यामुळे उकीरडा झाला होता. मात्र पालिकेच्या तब्बल २८ हजार सफाई कामगारांच्या फौजेने बुधवारी सकाळपासून मुंबईत साफसफाई सुरू केली. दिवसभरात सुमारे ९ हजार मेट्रीक टन कचरा उचलण्यात आला. तर समुद्रकिनारे लख्ख करण्यासाठी सफाई कामगारांनी धाव घेतली होती.

मुंबईमध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळत असतानाही पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील पहिल्या पाळीतील सफाई कामगार कामावर रूजू झाले आणि त्यांनी पावसाची पर्वा न करता सफाईचे काम सुरू केले होते. मंगळवारी दुपारी पावसाचे तांडव सुरू झाले आणि दुसऱ्या पाळीतील सफाई कामगार येण्याची शक्यता धुसर बनली. त्यामुळे पहिल्या पाळीत कामावर आलेल्या सफाई कामगारांना पालिकेच्या चौक्यांमध्येच थांबवून ठेवण्यात आले होते. बुधवारी भल्या पहाटे चौकीत थांबलेल्या सफाई कामगारांनी मुंबईची सफाई करण्याचे काम सुरू केले. दुपारी १ वाजेपर्यंत ठिकठिकाणचा तब्बल पाच हजार मेट्रीक टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Navi Mumbai, theft, worker theft,
नवी मुंबई : कामगाराने मित्राच्या मदतीने केली चोरी 
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

मुंबईतील अनेक भागात साचलेले  पाणी दुकाने आणि घरांमध्ये शिरले. त्यामुळे दुकानदार आणि रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी दुकानदारांनी दुकानांच्या सफाईचे काम हाती घेतले होते. दुकानदारांनी टाकून दिलेले भिजलेले धान्य आणि अन्य वस्तूंचा दुकानाबाहेर ढिग लागला होता. दुकानदारांनी टाकलेला कचरा उचलण्याचे कामही पालिकेने युद्धपातळीवर हाती घेतले होते. बुधवारी दिवसभरात सुमारे ९ हजार मेट्रीक टन कचरा पालिकेच्या सफाई कामगारांनी उचलला, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे झोपडय़ा जलमय झाल्या आणि झोपडपट्टीवासीयांचे अतोनात हाल झाले. झोपडपट्टय़ांमध्ये अस्ताव्यस्त कचरा पसरला होता. हा कचरा उचलण्याचे काम पालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी सकाळपासून सुरू केले. अरुंद वाटा आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये मंगळवारी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने झोपडपट्टय़ांच्या सफाईवर भर दिला आहे. त्याचबरोबर कीटकनाशक आणि धूम्रफवारणी करण्यात येत आहे.

गिरगाव, दादर, जुहू, हाजीअली, वरळी यासह विविध ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवर लाटांसोबत मोठय़ा प्रमाणावर कचरा वाहून आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर साचलेला कचरा साफ करण्याचे काम बुधवारी सकाळपासूनच सफाई कामगारांनी हाती घेतले आहे. समुद्रकिनाऱ्यावरुन सुमारे ३०० मेट्रीक टन कचरा गोळा होईल, असा अंदाज विजय बालमवार यांनी व्यक्त केला. केवळ सफाई कामगारच नव्हे, तर यंत्राच्या हा कचरा गोळा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा

मुंबईमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही आजही मोठय़ा प्रमाणावर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर होत आहे. मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा झटपट निचरा होण्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचा अडसर निर्माण झाला होता. जागोजागी तैनात असलेल्या पालिकेच्या सफाई कामगार प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करण्याचे काम करीत होते. समुद्राच्या लाटांबरोबरही मोठय़ा प्रमाणापर प्लास्टिकच्या पिशव्या किनाऱ्यावर साचल्या होत्या. हा कचरा गोळा करुन समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या कामात सफाई कामगार गुंतले होते.