मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मोठी रुग्णवाढ झाली. गुरुवारी २८२३ नवीन रुग्ण आढळले असून, ४८ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २९३३ रुग्ण करोनामुक्त झाले.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग कमी झालेला असला, तरी दर दिवशी नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. दर दिवशी दोन ते अडीच हजार रुग्ण मुंबईत आढळत आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या २,२२,७६१ वर गेली आहे. १,८६,६७५ रुग्ण म्हणजेच ८३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २४,७८९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

गुरुवारी ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात ४१ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३४ पुरुष व १४ महिला होत्या. ३८ जणांचे वय ६० वर्षांवरील होते. मुंबईतील मृत्युदर चार टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.

बोरिवलीत रुग्णसंख्या १४ हजारांपुढे

मुंबईत इतर विभागांच्या तुलनेत बोरिवली, कांदिवली व वांद्रे भागात संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बोरिवलीत दर दिवशी १५० ते २०० रुग्णांची नोंद होत असून या भागातील एकूण बाधितांची संख्या १४,५२० वर गेली आहे. सध्या या विभागात २६३७ रुग्ण उपचाराधीन आहेत. बोरिवलीव्यतिरिक्त अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले, मालाड, कांदिवली, धारावी-माहीम, भांडुप, घाटकोपर, ग्रॅन्टरोड, मुलुंड अशा १० विभागांमध्ये एकूण बाधितांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १ हजार ५१५ जणांना संसर्ग

ठाणे : जिल्ह्य़ात गुरुवारी १ हजार ५१५ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख ८७ हजार ३१२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ४७ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ४ हजार ७३४ इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ३९४, ठाणे शहरातील ३३६, नवी मुंबईतील ३३०, मीरा-भाईंदर शहरातील १५४, ठाणे ग्रामीणमधील १५४, बदलापूर शहरातील ४३, अंबरनाथ शहरातील ३७, उल्हासनगर शहरातील ३६ आणि भिवंडी शहरातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये ठाणे ग्रामीणमधील १५, कल्याण-डोंबिवलीतील ८, ठाणे शहरातील ६, मीरा-भाईंदरमधील ६, नवी मुंबईतील ५, भिवंडीतील ३, उल्हासनगरमधील २ आणि अंबरनाथमधील २ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात दिवसभरात १३,३९५ बाधित

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत १३,३९५ करोना रुग्णांचे निदान झाले असून, ३५८ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १५,५७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील करोनाबाधितांची संख्या १५ लाखांच्या आसपास झाली असून, मृतांचा आकडा ३९,४३० इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत नाशिक शहर ५३३, नगर ८८४, पुणे शहर ८०८, पिंपरी-चिंचवड ५२६, उर्वरित पुणे जिल्हा ६७८, सातारा ४९५, नागपूर शहर ५९६ रुग्ण आढळले.