भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मुंबईत दोन दिवस उमटले आणि यात बेस्ट चांगलीच होरपळली. गेल्या दोन दिवसांत मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात एकूण २८६ बसची तोडफोड करण्यात आली आहे. बुधवारी महाराष्ट्र बंद दरम्यान तर बेस्टचे मोठे नुकसान झाले. एकाच दिवसात बेस्टच्या २०४ बसचे नुकसान आंदोलकांकडून करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले. या बस सेवेत येण्यासाठीही काही दिवस लागणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता आहे.

सध्या बेस्टला मोठी आर्थिक चणचण भासत आहे. बेस्ट उपक्रमाचा तोटा तर ९०० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे तोटा कमी करतानाच उत्पन्न वाढीसाठी बेस्टकडून नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच नवीन बस घेणे शक्य नसल्याने बेस्ट प्रशासनाकडून भाडेतत्त्वावरही बस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. अशी स्थिती असतानाच २ आणि ३ जानेवारी रोजी मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात बेस्टच्या बस गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. आधीच आर्थिक चणचण भासत असतानाच दोन दिवसांत बस गाडय़ांची झालेली तोडफोड आणि कमी झालेले प्रवासी उत्पन्न यामुळे बेस्टची आर्थिक वाताहतच झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्टच्या गाडय़ांना लक्ष्य करतानाच २ जानेवारी रोजी ८० बस गाडय़ांची तोडफोड करण्यात आली होती. महाराष्ट्र बंद शांततेत होईल असे वाटत असल्याने बेस्टकडून सर्व बस गाडय़ा रस्त्यावर उतरवण्यात आल्या. मात्र आंदोलकांनी ३ जानेवारी रोजीही केलेल्या आंदोलनात २०४ बसचे नुकसान झाले. त्याआधी १ जानेवारी रोजीही ३ बसची तोडफोड करण्यात आल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. अशाप्रकारे २८६ बसचे नुकसान झाल्याने या बस सेवेत येण्यासाठीही काही दिवस लागतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही होण्याची शक्यता आहे. बसच्या खिडक्यांवरील काचा, टायर इत्यादी नुकसान झाले आहे.

मुंबईत झालेल्या दोन दिवस आंदोलनकाळात बेस्टचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय प्रवासी उत्पन्नही बुडाले आहे. या भरपाईसाठी आम्ही राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणार आहोत.

अनिल कोकीळ, बेस्ट समिती-अध्यक्ष