२९ लाख प्रवासी परराज्यांतून मुंबईत; २२ लाखांहून अधिक प्रवासी उत्तर भारतातून

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदी लागू झाल्यानंतर बेरोजगारी आणि करोनाची भीती यांमुळे मुंबई महानगरी सोडून आपापल्या गावी गेलेल्या परप्रांतीयांची आता परतण्याची घाई सुरू झाली आहे. जुलैपासूनच परतीच्या प्रवासाला वेग आला असून आतापर्यंत २९ लाख प्रवासी परराज्यांतून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामध्ये उत्तर भारतीयांची संख्या २२ लाख ६२ हजार ६३७ इतकी असल्याचे त्या राज्यांतून आलेल्या रेल्वेगाडय़ांतील प्रवासीसंख्येवरून दिसते.

जूनपासून टाळेबंदी शिथिल होताच परराज्यांत गेलेले नागरिक पुन्हा मुंबई महानगरात  परतू लागले आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यात मोठय़ा संख्येने प्रवासी दाखल होत आहेत. मध्य रेल्वेवर परराज्यांतून मुंबईसाठी १५ विशेष गाडय़ा येतात. आतापर्यंत या गाडय़ांमधून १६ लाख प्रवासी मुंबई व परिसरात दाखल झाले आहेत. तर पश्चिम रेल्वेवर हीच संख्या १३ लाख ३ हजार ४८७ आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबईत दाखल होणाऱ्या गाडय़ा गोरखपूर, पाटलीपुत्र, वाराणसी, पटणा, दरभंगा, लखनौ या उत्तर भारतातून, तर दक्षिण भारतातील त्रिवेंद्रम, हैद्राबाद, बैंगलोर, गडद येथून आहेत. जून ते सप्टेंबपर्यंत उत्तर भारतातून मध्य रेल्वेवरून १३ लाख ५८ हजार जण आले. तर दक्षिण भारतातून के वळ २ लाख ४२ हजार जण आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम रेल्वेच्या गाडय़ांमधूनही उत्तर भारतातील गोरखपूर आणि गाजीपूर येथून १ लाख ८६ हजार ७२३ आणि बिहारच्या मुजफ्फरपूर येथून १ लाख ७ हजार ४०४ जण दाखल झाले. तर नवी दिल्लीतूनही १ लाख १४ हजार ५३९ आणि अमृतसर येथून ४ लाख ९५ हजार ९७१ जणांनी मुंबईसाठी परतीचा प्रवास के ला आहे. याशिवाय राजस्थानमधील जोधपूर आणि जयपूर येथून ३ लाख ९८ हजार ८५० आल्याचे सांगितले

कामगार पुन्हा कर्मभूमीत

करोनामुळे टाळेबंदी होताच मुंबई महानगरात राहणाऱ्या परराज्यांतील नागरिकांनी आपल्या गावी स्थलांतर करण्यास सुरुवात के ली. मिळेल त्या वाहनाने अनेक जण महाराष्ट्राबाहेर गेले. राज्य शासन व रेल्वेने श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्या. त्यानंतर काही विशेष रेल्वेगाडय़ाही सोडल्या. परंतु टाळेबंदीच्या दोन ते अडीच महिन्यातच लाखोंच्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली, अमृतसर, हैद्राबाद, गडद व दक्षिण भारतातील अन्य शहरांत रवाना झाले. त्यामुळे मुंबई महानगरातील विविध प्रकल्प व छोटय़ा-मोठय़ा उद्योगधंद्यांमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांचीही गरज भासू लागली. आता हे कामगार मोठय़ा संख्येने परतू लागले आहेत.

या स्थानकांवर गर्दी

पश्चिम रेल्वेवरून मुंबईत दाखल होणाऱ्या विशेष रेल्वे गाडय़ा मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत येताना दादर, बोरिवली येथे थांबा मिळतो. तर मध्य रेल्वेवरील गाडय़ा सीएसएमटी, एलटीटी, दादपर्यंत येताना कल्याण, ठाणे, पनवेल येथे थांबा आहे. त्यामुळे या स्थानकांवर परप्रांतीयांची गर्दी जाणवते.