मुंबई-नागपूर हा अतिवेगवान समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यजीवांच्या सुरक्षित व मुक्त संचाराचा पहिल्यांदाच विचार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वन क्षेत्रातून जाणाऱ्या या महामार्गावर २९५ ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग व इतर व्यवस्था करण्यात येत आहे.

महामार्गाच्या आराखडय़ात तसा बदल करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, याकरिता भुयारी मार्ग व पुलांखाली ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

रस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडके ने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून फार तर रस्त्यांच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना जाळ्यांचे कुंपण घातले जाते. परंतु त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराचा विचार करण्यात आला आहे. सुमारे ७०० किलोमीटरचा हा महामार्ग असून

के वळ सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे. १४ जिल्ह्य़ांतून हा महामार्ग जातो. त्यांपैकी ११८ किलोमीटरचा पट्टा हा वन क्षेत्रातून जातो. भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर के लेल्या पाहणीनुसार या परिसरात नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, जंगली डुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी प्राणी, तसेच जंगली मांजर, बिबटय़ा, सोनेरी कोल्हा, भारतीय कोल्हा, भारतीय लांडगा, पट्टेवाला तरस, अस्वल यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.

या वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून जाण्याऱ्या महामार्गावर त्यांचा मुक्त संचार व्यत्ययविरहित राहावा आणि निर्धोक व नैसर्गिकरीत्या त्यांना महामार्गाच्या या बाजूकडून, त्या बाजूला सहजपणे जाता यावे याकरिता १७९७ संरचना करण्यात येत आहेत. त्यापैकी वन क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर पाच मोठे पूल, १९ लहान पूल, १९ भुयारी मार्ग, सात उन्नत मार्ग यांसह आणखी लहान-मोठय़ा अशा २९५ संरचना करण्यात येणार आहेत.

महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात, त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयाऱ्यात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे राज्याच्या कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किं वा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल तर सर्वात आधी वन्यजीवांच्या येण्याजाण्याचा मार्ग सुरक्षित व निर्धोक करण्यास प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.