सोन्याची तस्करी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एका महिलेसह तिघांना मुंबई विमानतळावर शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरची आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दुबईहून  शुक्रवारी सकाळी आलेल्या एका विमानातून उतरलेले तीन प्रवासी एका छोटय़ा ट्रॉलीला घेऊन जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या ट्रॉलीत केवळ दोन छोटे बॉक्स होते त्यामुळे त्यांचा संशय आला आणि हवाई गुप्तचर विभागाने त्यांची चौकशी केली. त्या बॉक्समध्ये सोन्याचे बार दडवून ठेवल्याचे आढळले. त्यांची किमंत सुमारे ३ कोटी रुपये असल्याचे सीमा शुल्क उत्पादन विभागाने सांगितले. सलमा करोलिया (४०) या दक्षिण आफ्रिकन महिलेसह सदेह अहमद (४०) आणि सेदू युसूफ (३४) या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त मिलिंद लांजेवार यांनी दिली. सलमा यापूर्वी १९ वेळा भारतात आली होती. त्यामुळे त्यावेळी सुद्धा तिने सोन्याची तस्करी केल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.